सोलापूर - महानगरपालिकेच्या महात्मा गांधी प्राणी संग्रहालयात पुन्हा एकदा चोरीचा प्रकार घडला आहे. यावेळी चोरट्यांनी संग्रहालयाच्या ऑफिसमधील संगणक चोरी करून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.
विजापूर रोडवरील सोलापूर महानगरपालिकेचे महात्मा गांधी प्राणीसंग्रहालय असून याठिकाणी वारंवार चोरीच्या घटना घडत आहेत. ड्युटीवर असलेल्या शिपायांनी प्राणिसंग्रहालयात येण्यास मज्जाव करताच चोरट्यांनी शिपायाला मारहाण केली. यानंतर त्यांनी संग्रहालयात प्रवेश केला.
प्राणिसंग्रहालयात चोरांना चोरण्यासाठी विशेष असे काही न मिळाल्याने चोरट्यांनी प्राणिसंग्रहालयाचे मुख्य प्रवेशद्वार उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर प्राणिसंग्रहालयाच्या बुकिंग ऑफिस मध्ये पैसे शोधण्याचा प्रयत्न केला तिथेही त्यांना अपयश आल्याने कार्यालयाचे शटर उचकटून कार्यालयीन कामकाजाकरता ठेवण्यात आलेला संगणक चोरट्यांनी चोरुन नेला आहे.
घटनेची नोंद सदर बाजार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस यंत्रणेकडून केला जात आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्रीकांत मायकलवर यांनी दिली.