सोलापूर - माढा तालुक्यातील टेम्भुर्णी येथील एका शेतात लाखोंची डिझेल तस्करी होताना स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकला आहे. या कारवाईत जवळपास सात लाखांचे डिझेल व इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. यामध्ये श्रीकृष्ण विजय कोल्हे, (वय 34 वर्ष, रा. कोल्हे वस्ती, टेम्भुर्णी, ता. माढा, जि. सोलापूर), शंकर राजाराम किर्ते (वय 45 वर्ष, रा बेंबळे ता. माढा, जि. सोलापूर.) या दोघांना अटक करून टेम्भुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. तसेच जमिनीत पुरलेले दोन मोठे डिझेल टाक्यादेखील जप्त केल्या आहेत.
टँकरचा पाठलाग करून पकडली डिझेलतस्करी
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस टेम्भुर्णी परिसरात गस्त करत होते. एक डिझेलचा टँकर वेगाने जात असताना दिसला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या टँकरचा पाठलाग केला आणि तेदेखील शेताकडे धावू लागले. पुढे गेल्यावर पोलिसांना शेतात डिझेल पंप दिसला. पोलिसांना पाहून श्रीकृष्ण कोल्हे हा पळून जात होता. पण पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला जागेवरच पकडले.
11 रुपये कमी दराने डिझेल विक्री
शासकीय दराने 86 रुपयांपर्यंत वाहनधाकांना डिझेल मिळत आहे. पण टेम्भुर्णी एमआयडीसीजवळ असलेल्या एका शेतात डिझेल तस्करीतून 11 रुपये कमी दराने डिझेल विक्री केली जात होती. हा प्रकार गेल्या तीन महिन्यांपासून सुरू होता. एमआयडीसीमध्ये येणारे अनेक ट्रक हे तस्करीचे डिझेल विकत घेत होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना ही माहिती अनेक दिवसांपूर्वी मिळाली होती. पोलिसांनी बुधवारी सायंकाळपासून या तस्करीचा शोध सुरू केला होता आणि त्यांनी एका ट्रकचा पाठलाग करत ही डिझेलतस्करी उघडकीस आणली.
सात लाखांचा मुद्देमाल हस्तगत
स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकून श्रीकृष्ण उर्फ दादा कोल्हे व कामगार शंकर किर्ते या दोघांना अटक केली आहे. तर रमेश कोल्हे हा पळून जाण्याचा यशस्वी झाला आहे. टेम्भुर्णी पोलीस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू अधिनियम कायदा 1955 कलम 3 व 7प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे तसेच दोन मोठ्या डिझेल टाक्या, एक ट्रॅक्टर, सहा लोखंडी व प्लास्टिक बॅरल, 50 लिटर डिझेल असा 7 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेने उघडकीस आणली तस्करी
सोलापुरात होत असलेली डिझेल तस्करी ही सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, सहायक पोलीस फौजदार ख्वाजा मुजावर, नीलकंठ जाधवर, धनाजी गाडी, नारायण गोलेकर, अक्षय दळवी आदींनी केली.