सोलापूर - एमआयडीसी पोलीस ठाण्यातील डीबी पथकाने चार संशयित चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. एमआयडीसी पोलीस ठाणे आणि जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या पाच घरफोड्या आणि दुचाकी चोरीचा शोध लावला आहे. यामध्ये पोलिसांनी एका महाविद्यालयीन तरुणाला देखील बेड्या ठोकल्या आहेत. त्याने मौजमजेसाठी दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी या संशयित चोरट्यांकडून 2 लाख 8 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
चोरट्याने दिले घरफोडीतील दागिने
घरफोडीतील संशयित आरोपी संतोष मच्छीन्द्र चव्हाण (वय 38 वर्षे, रा. तळे हिप्परगा, सोलापूर), मल्लिकार्जुन नगर येथे येणार असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक सिद्धनाथ खांडेकर यांना मिळाली होती. यावरुन सापळा लावून त्यांच्या पथकाने संतोष यास ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता, त्याने एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन घरफोड्या केल्याची कबुली दिली व घरफोडीतील सोने-चांदीचे दागिने पोलिसांच्या ताब्यात दिले.
नई जिंदगी येथील बेरोजगार तरुणांनी चोरल्या मोटारी
नई जिंदगी येथील इसाक उर्फ डॅनी कय्युम शेख (वय 23 वर्षे, रा शोभा देवी नगर, सोलापूर), हमीद गफ्फार जमादार (वय 28 वर्षे, रा, शोभा देवी नगर, सोलापूर) या दोघांना अनेक दिवसांपासून काम नव्हते. त्यांनी नवी शक्कल लढवत बंद कारखाने फोडले. या कारखान्यातील यंत्राला असलेले मोठे विद्यूत मोटारी चोरल्या. डीबी पथकाच्या पोलिसांना ही माहिती मिळाली. त्यांनी नई जिंदगी येथील एका मंगल कार्यालयाजवळ दोघांना ताब्यात घेतले. या दोघांना विश्वासात घेऊन अधिक माहिती घेतली असता त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली.
मौजमजेसाठी विद्यार्थी झाला संशयिय चोरटा
सोलापुरातील ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांने मौजमजेसाठी दुचाकी चोरल्या. शरणप्पा इक्कळगी (वय 20 वर्षे, रा. पद्मान नगर, सोलापूर), असे संशयित चोरट्याचे नाव आहे. हा सोलापुरातील एका महाविद्यालयात डिप्लोमाचे शिक्षण घेत आहे. पण, घरची परिस्थिती ही बेताची असल्याने त्याला दुचाकी विकत घेणे परवडत नव्हते. अखेर त्याने दोन दुचाक्या चोरल्या. पोलिसांनी त्याला अटक करुन त्याच्याकडील दोन्ही दुचाक्या जप्त केल्या आहेत.
हेही वाचा - अल्पवयीन गतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्यास 15 वर्षे सक्तमजुरी
हेही वाचा - महिला दिनानिमित्त महिला कर्मचाऱ्यांची विशेष एक्सप्रेस ट्रेन सोलापुरातून मुंबईला रवाना