सोलापूर- कोरोना विषाणूच्या प्रसार रोखण्यासाठी खबरदारी म्हणून राज्यातील शाळांना टाळे लावण्यात आले. मात्र, यंदाचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून प्रशासनाने ऑनलाईन शिक्षणाची संकल्पना पुढे आणली. या संकल्पनेत उच्च वर्गातील विद्यार्थ्यांचा फायदा झाला. परंतु, गोर गरीब विद्यार्थ्यांकडे ना स्मार्ट फोन ना लॅपटॉप, मग ऑनलाईन शिक्षण कसे घ्यायचे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या किंवा महानगरपालिकेच्या शाळांत शिकणाऱ्या गोर गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न सोडवायचा कसा अशी समस्या निर्माण झाली. त्यावर सोलापूर महानगरपालिकेच्या शिक्षकांनी भन्नाट संकल्पना राबवत 'शिक्षण आपल्या दारी' ही नवी संकल्पना आणली व ऑफलाईन शिक्षण सुरूच ठेवले.
सोलापूर महानगरपालिका शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांच्या घरी शिक्षकांची वारी जात आहे. यातून शहरातील गरीब वस्तीमध्ये व झोपडपट्ट्या मधील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. मार्च महिन्यापासून शहरातील, जिल्ह्यातील व संपूर्ण देशातील शाळांना टाळे लागले. कोरोनामुळे विद्यार्थ्यांनासमोर ऑनलाईन शाळेची नवी संकल्पना समोर आली. ज्यांकडे स्मार्टफोन किंवा लॅपटॉप आहे, त्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन क्लासेस किंवा ऑनलाईन शाळेचा फायदा घेतला. परंतु गोरगरीब विद्यार्थ्यांच काय? असा प्रश्न पडला होता.
'शिक्षकांची वारी, शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या दारी'-
झोपडपट्ट्यामधील विडी कामगार, रिक्षा चालक, फेरीवाले यांची मुलं शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून सोलापूर महानगरपालिकेतील शिक्षण अधिकारी कादर शेख, मुख्याध्यापक झीनत कौसर, अफरोज बागवान यांनी 'शिक्षकांची वारी, शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या दारी' ही योजना सुरू केली. यामध्ये विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिक्षणाचे धडे देण्यास सुरुवात केली.शास्त्री नगर, मौलाली चौक, मड्डी वस्ती, घोंगडे वस्ती, नीलम नगर, बेडरपूल, विजापूर रोड व सोलापूर शहरातील सर्व महानगरपालिकेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यामधून जोडण्यात आले. संबंधित शिक्षक हे घरोघरी जाऊन स्व खर्चाने तयार केलेल्या नोट्स किंवा स्वाध्याय संच वाटप करून शैक्षणिक धडे देण्यास सुरुवात केली.
मजूर करणाऱ्या पालकांकडून विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर फारसे लक्ष दिले जात नाही. मात्र, हा उपक्रम रावल्यानंतर शिक्षक थेट विद्यार्थ्यांच्या घरी जात असल्याने शिक्षकांचा आणि पालकांचा संवाद वाढला आहे. त्यातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे महत्व पटवून देण्यात शिक्षकांना यश आले आहे. तसेच पालकांनाही आपल्या पाल्याच्या शिक्षणातील प्रगतीची माहिती होऊ लागली आहे. त्यामुळे या उपक्रमाचे पालकांकडून कौतुक केले जात आहे.
मनपा शिक्षण विभागाची स्तिथी
एकूण शाळांची संख्या -58
एकूण शिक्षक संख्या - 212
एकूण विद्यार्थी संख्या -5 हजार
एकूण शाळा -
मराठी-30शाळा,
उर्दू- 22 शाळा,
तेलगू-2 शाळा,
इंग्रजी माध्यम-1 शाळा