सोलापूर - केंद्रातील भाजप सरकार रोजगारासह अनेक आश्वासनांची पूर्तता न करता केवळ बढाया मारण्याचे काम करत आहे. नोटाबंदीमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली असून विकास दरही कमी झाला आहे. 370 कलम हटवल्यानंतर जम्मू-काश्मीररमध्ये या सरकारने एकप्रकारे अघोषित आणीबाणीच लादलेली आहे. हे लक्षात घेता या सरकारला देशात हुकूमशाही आणायची आहे. तेव्हा जनतेने विधानसभा निवडणुकीत भाजपला धडा शिकवून हुकूमशाहीचा डाव हाणून पाडावा, असे आवाहन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले. बुधवारी शहर मध्य मतदारसंघातील काँग्रेस आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या पूर्व भागातील संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन सुशीलकुमार यांच्याहस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा - नेत्यांसह कार्यकर्तेही थकलेल्या पक्षात राहायला तयार नाहीत, उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला टोला
सुशीलकुमार शिंदे यांनी शहर मध्यमधील शिवसेनेचे उमेदवार दिलीप माने यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, ज्यांना काँग्रेसने आमदार केले, बाजार समितीचे सभापतीपद देऊ केले. एवढेच नव्हे यंदाच्या निवडणुकीत दक्षिण सोलापूरमधून उमेदवारी देण्याची तयारी ठेवली. पण, त्यांच्यात हिम्मत नसल्याने ते मतदारसंघ सोडून पळून गेले. काँग्रेस हा सर्वधर्मसमभाव मानणारा आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र येऊन लढल्यास विरोधीपक्षांचा निभाव लागणार नाही. ज्यांनी पूर्व भागातील कारखाने बंद करण्याचे काम केले, अशा उमेदवाराची जनता या निवडणुकीत धडा शिकवेल, असेही शिंदे यांनी माकपचे उमेदवार कामगार नेते नरसय्या आडम यांचे नाव न घेता टीका केली.
हेही वाचा - 'हे' दृश्य पाहून शरद पवारही विचारात पडले असतील
आमदार प्रणिती शिंदे यावेळी म्हणाल्या की, मी जातपात, धर्म मानत नाही. मी जात-धर्माचा राजकारणासाठी वापर करण्याइतकी कमकुवत नाही. कामाच्या आधारावर मी मतदारांसमोर जात आहे. शहर मध्यवर सर्वांचा डोळा आहे. या मतदारसंघात निवडणूक लढवणार्यांनी हे लक्षात घ्यावे की, इथे निवडून येण्यासाठी आधी अनेक वर्षे काम करावे लागते. लोकांशी नाते जोडावे लागते. मी निर्माण केलेले विश्वासाचे नाते कोणी तोडू शकणार नाही. मला सत्ता, पद, मंत्रीपदाची लालसा नाही. केवळ लोकहिताच्या कामाचा ध्यास असल्याने मी निवडणूक लढवते. मी केलेल्या कामाच्या पावती मला मतदारांनी या निवडणुकीत द्यावी, असे आवाहन करत प्रणिती शिंदे यांनी केले. सत्ता, कमिशन व पावतीसाठी काही मंडळी या मतदारसंघात निवडणूक लढत असल्याची टीकाही त्यांनी केली.