सोलापूर- कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेनंतर नव्या स्वरुपात आढळून आलेल्या कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटचा प्रादुर्भाव राज्यात काही ठिकाणी आढळून आला आहे. त्या पार्श्वभूमीवर सोलापूरशहर व जिल्ह्यात याचा प्रादुर्भाव होऊ नये या दृष्टीने सोलापूर महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी नवे आदेश पारित केले आहेत. या आदेशानुसार सोलापुरात सायंकाळी 4 वाजेपर्यंत अत्यावश्यक व इतर दुकानांना व्यवहार करण्यास परवानगी देण्यात आली आहे, तर शनीवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळून सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे निर्बंध जारी करण्यात आले आहेत. आहेत.
दररोज सायंकाळी 5 नंतर सोलापूर शहर आणि जिल्ह्यात संचारबंदी राहणार आहे. याबाबत रविवारी सोलापूर महानगरपालिका आयुक्तांनी आदेश पारित केला, तर जिल्हाधिकारी यांनी शनिवारी रात्री ग्रामीण भागासाठी आदेश पारित केला होता. स्थानिक प्रशासनाने सोलापुरात दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागु केली आहे.
सोलापुरात सोमवारापासून सायंकाळी चारपर्यंतच दुकाने राहणार सुरू-
कोरोनाच्या नव्या विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्याचा उपाय म्हणून शहरात पुन्हा मिनी लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार सायंकाळी चार वाजेपर्यंतच खुली राहतील. मॉल व थिएटर पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिले आहे. रविवारी दिवसभर मिनी लॉकडाऊनबाबत बैठका घेऊन अखेर निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला.
सोलापूर शहरात असे असतील निर्बंध-
- सोलापूर शहरातील हॉटेल, रेस्टाॅरंट पुन्हा एकूण क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने सायंकाळी चारपर्यंत सुरू राहतील. सायंकाळी 4 ते रात्री ११ पर्यंत केवळ घरपोच सेवा देता येईल.
- सार्वजनिक मैदाने सकाळी ५ ते ९ या वेळेतच सुरू राहतील.
- मेळावे व इतर सामाजिक कार्यक्रम एकूण क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने करण्याची परवानगी देण्यात आली आहे. सोमवार ते शुक्रवार सायंकाळी चारपर्यंतच करण्यात यावेत.
- विवाह सोहळ्यासाठी फक्त ५० जणांना परवानगी असेल. अंत्यविधीसाठी २० जणांना परवानगी असेल.
- जीम, सलून, ब्युटी पार्लर, कृषी उपक्रम, मद्यविक्री, फळविक्रेते, भाजीपाला विक्रेते सायंकाळी चारपर्यंत सुरू राहतील.
- सोलापूर शहरात सायंकाळी पाचनंतर संचारबंदी असेल.