सोलापूर - कुस्तीपटू बबिता फोगाटच्या प्रतिमेला सोलापूर शहर युवक काँग्रेसच्यावतीने जोडे मारून निषेध व्यक्त करत आंदोलन केले आहे. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबद्दल बबिता फोगाटने आक्षेपार्ह विधान केले होते.
सोमवारी दुपारी काँग्रेस भवन परिसरात सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोडे मारो आंदोलन केले. युवती काँग्रेसच्या श्रद्धा हुल्लेनवरू व प्रियांका डोंगरे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी देशात कॉम्प्युटर क्रांती आणली, खेळाडूंना प्रोत्साहन दिले, पंचायत राजची सुरुवात केली, अठरा वर्षांवरील युवकांना मतदानाचा अधिकार दिला, अशा नेत्यांविरोधात कुस्तीपटू बबिताने राजकीय फायद्यासाठी ट्विटरवर वादग्रस्त वक्तव्य केले. बबिताने हे वादग्रस्त वक्तव्य मागे घ्यावे व माफी मागावी, अशी मागणी सोलापूर शहर युवक काँग्रेसच्यावतीने करण्यात आली.