सोलापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस सोलापूर युवक काँग्रेसने बेरोजगार दिन म्हणून साजरा केला. काँग्रेस भवन येथे केंद्र सरकारविरोधात हल्लाबोल करत गोट्या खेळून वाढदिवस साजरा करण्यात आला. नरेंद्र मोदींमुळे देशात बेरोजगारी वाढली आहे. अनेक उच्च शिक्षित तरुणांना आपले रोजगार गमवावे लागले आहेत. तसेच तरुणांना नोकऱ्या उपलब्ध होत नाहीत, असा आरोप यावेळी सोलापूर युवक काँग्रेसच्यावतीने करण्यात आला. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कोट्यवधी युवक बेरोजगार झाले आहेत. त्यांच्यावर गोट्या खेळण्याची वेळ आली आहे. याचेच प्रतिकात्मक म्हणून मोदींचा वाढदिवस गोट्या खेळून साजरा करण्यात आला.
हेही वाचा - कोरोनाच्या काळात नितीन गडकरींकडून युट्यूबचा वापर; महिन्याला कमवितात 'इतके' लाख रुपये
- वर्षाला दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याचे खोटे आश्वासन-
वर्षाला दोन कोटी रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देऊन मोदी सरकार सत्तेत आले. चुकीच्या धोरणांमुळे अनेक रोजगार गेले. नोटबंदी, जीएसटी याची चुकीची व अपयशी अंमलबजावणी, सरकारी कंपन्या विकण्याचा डाव यामुळे रोजगार तर लागले नाहीत, उलट यामधून निघणाऱ्या अनेक नोकऱ्या निर्माणच झाल्या नाहीत. छोटे आणि लघु उद्योग बंद पडले आहेत, असे अनेक आरोप काँग्रेसचे सोलापूर जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील व युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंबादास करगुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केले आहेत.
- चुकीचे सल्ले देण्याचे काम सरकार करत आहे-
अनेक पालक आपल्या मुलांना कर्ज काढून शिक्षणाचे धडे देत आहेत. पण सरकारने या पालकांना आणि उच्च शिक्षित तरुणांना 'पकोडे विका' असे सल्ले देत आहेत. या बेजबाबदार सरकारपर्यंत बेरोजगार तरुणांचा आवाज पोहचावा म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस बेरोजगार दिन म्हणून साजरा करण्यात आला. प्रतिकात्मकरित्या काँग्रेस भवन समोर गोट्या खेळून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. आंदोलनात काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.