सोलापूर - जिल्ह्याची श्रीमंती देशभरात दाखविण्याचा प्रयत्न सोलापूर सोशल फाउंडेशनद्वारे केला जात आहे. त्याचबरोबर ४० लाख सोलापूरकरांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार आणि योगदान घेण्याची जबाबदारी सोलापूरकरांनी घ्यावी, अशी भावना सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केली.
सोलापूर सोशल फाऊंडेशनचा प्रथम वर्धापनदिन अक्षयतृतीयाला सहकार, पणन आणि वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते 'ब्रँडिंग सोलापूर कॉनक्लेव्ह' ह्या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली. यावेळी सुभाष देशमुख म्हणाले, सोलापूरचा विकास करण्यासाठी सकारात्मक गोष्टींना घेऊन देशभर प्रसार करण्याची गरज ओळखून सोलापूर सोशल फाऊंडेशनची स्थापना केली. त्या माध्यमातून सोलापूरचा विकास होण्यासाठी पर्यटन, रोजगार आणि तरुण उद्योजक निर्माण होण्यासाठी फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. आजपर्यंत सोलापूर जिल्हा नकारात्मकरित्या समोर आणला गेला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सोलापूरचे ब्रँडिंग होणे गरजेचे आहे. राज्यात सोलापूर जिल्हा पहिल्या पाच क्रमांकामध्ये आणण्यासाठी योगदान द्यावे.
सोलापूर ब्रँड हा अजेंडा सातत्याने लावल्यास देशभरात सोलापूरची श्रीमंती कळणार आहे. पर्यटन विभागाच्यावतीने सोलापूर जिल्ह्यातील अनेक स्थळांना भरघोस निधी दिला. दक्षिण भारताचे प्रवेशद्वार म्हणून सोलापूर जिल्ह्याचे मार्केटिंग आम्ही करणार असल्याचे असल्याचे पर्यटन मंत्री रावल म्हणाले.
सोलापूर सोशल फाऊंडेशनच्या वर्षभरातील कार्य-अहवाल पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते सोलापुरातील उच्च कामगिरी केलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा 'श्रीमंती सोलापूरची' या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यामध्ये देशी वाणांचा विकास करणारे अनील गवळी, सामाजिक कार्यकर्त्या अंजली नानल, चित्रकार असिफ शिकलगार, ह.भ.प. बोधले महाराज, प्रगतशील शेतकरी राजू भंडार कवठेकर, जिल्हा सरकारी वकील प्रदिपसिंह राजपूत, उद्योजक रवींद्र बगले यांचा सत्कार करण्यात आला.