सोलापूर - महानगरपालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी घनकचरा विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी गुगल कॅलेंडर कामकाज प्रणाली आणली आहे. या कामकाज प्रणालीत घनकचरा कर्मचाऱ्यांचे प्रत्येक तासाला काम करतानाचे फोटो आवश्यक केले आहे. तरच यांचे वेतन अदा केले जाईल अन्यथा वेतन कपात केली जाईल, असा आदेश त्यांनी काढला आहे. आयुक्तांच्या या आदेशाला तीव्र विरोध करत घनकचरा व्यवस्थापन विभागात काम करणाऱ्या बिगारी, झाडू मारणाऱ्या महिला कामगार, ड्रेनेज चेंबर मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या आदेशाला तीव्र विरोध केला. तसेच पालिकेच्या या निर्णया विरोधात या कर्मचाऱ्यांनी बुधवारी पालिकेच्या मुख्य सभागृहाबाहेर ठिय्या आंदोलन केले.
सोलापूर शहरातील घनकचऱ्याचे नियोजन महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागामार्फत केले जाते. या विभागात सॅनिटरी इन्स्पेक्टर(आरोग्य निरीक्षक) यांच्या मार्फत बिगारी, वेठ बिगार कर्मचारी, सफाई कामगार, झाडू मारणाऱ्या महिला काम करतात. मात्र, काही कर्मचारी कामचुकारपणा करत असल्याच्या तक्रारी दाखल झाल्यानंतर पालिका आयुक्तांना या कर्मचाऱ्यासाठी गुगल कॅलेडर कामकाज प्रणाली पद्धत सुरू केली. त्यानुसार या कर्मचाऱ्यांचे काम करतानाचे प्रत्येक तासाला सॅनिटरी इन्स्पेक्टर फोटो काढतील आणि वरिष्ठांना व्हाट्सएपच्या माध्यमातून पाठवतील. त्यामुळे जे कुणी कर्मचारी कामात टाळाटाळ किंवा टाईम पास करतील यांवर वेतन कपातीची कुऱ्हाड पडणार आहे. मात्र, या नवीन कामकाज प्रणालीस घनकचरा विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी विरोध केला आहे.
गुगल कामकाज प्रणालीचा विरोधात घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचाऱ्यांनी सोलापूर पालिकेत ठिय्या आंदोलन केले. यावेळी कामगारांनी या पद्धतीस विरोधाचे कारण स्पष्ट करताना म्हटले आहे की, एखादा वेठ बिगार कर्मचारी ड्रेनेज पाईप लाईनमध्ये सतत आठ तास काम करू शकत नाही, त्याच्या जीवितास धोका होऊ शकतो. घनकचरा व्यवस्थापन विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सतत आठ तास काम करवून घेणे म्हणजे त्यांच्या जीवितास धोका आहे, असे संबंधित कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. सोलापूर महानगरपालिकेला घनकचरा व्यवस्थापनाचे काम वेळेत करून देऊ असे आश्वासन कर्मचारी संघटनेने दिले आहे. पण कर्मचाऱ्यांना शरीराची जीवघेणी हेळसांड होऊ नये. त्यामुळे गूगल कॅलेंडरचा आदेश पालिका आयुक्तांनी मागे घ्यावा, अन्यथा कामबंद करून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा स्वच्छता कर्मचाऱ्यांनी दिला आहे.