सोलापूर - शहर व जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. रविवारी एकाच दिवशी सोलापूर शहर व ग्रामीण मिळून 316 रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. रविवारी मध्यरात्री पासून सोलापूरमध्ये लागू करण्यात आलेली दहा दिवसांची संचारबंदी समाप्त झाली. अनलॉकमध्ये आणखी किती रुग्ण वाढतील याचा प्रशासनासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मिळून कोरोना संसर्गजन्य आजाराच्या 3955 चाचण्या झाल्या. यामध्ये 316 रुग्ण पॉझिटिव्ह मिळून आले आहेत. तर मृत झालेल्या रुग्णांची संख्या 9 आहे. रविवारी जिल्ह्यात 391 जण कोरोना मुक्त झाले आहेत. सोलापूर शहरात रविवारी 2700 अहवाल प्राप्त झाले. यात 2538 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर शहरात रविवारी 162 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामध्ये 82 पुरुष व 80 स्त्रियांचा समावेश आहे. रविवारी शहरातील 43 रुग्ण कोरोना आजाराने मुक्त झाले आहेत. तर 3 पुरुष मृतांची नोंद आहे. यामध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 2 पुरुष व खासगी रुग्णालयात एका पुरुष रुग्णाचा कोरोना आजाराने मृत्यू झाला आहे.
सोलापूर ग्रामीण मध्ये रविवारी 1255 अहवाल प्राप्त झाले आहे. त्यामधून 1101 निगेटिव्ह तर 154 पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. रविवारी सोलापूरच्या ग्रामीण भागामध्ये 348 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आले आहे. तर सहा रुग्णांचा कोरोना आजाराने बळी घेतला आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मिळून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 7383 झाली आहे. तर यातील 4118 जण कोरोना मुक्त झाले आहेत. सध्या 2845 कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत सोलापूरात कोरोना विषाणूने 420 रुग्णांचा बळी घेतला आहे.
काही गावात संचारबंदी कायम-
सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ग्रामीण भागातील बार्शी, अक्कलकोट, मोहोळसह काही गावात लागू केलेली संचारबंदी 31 जुलैपर्यंत लागू राहील, अशी माहिती दिली आहे. मात्र, यातील काही गावांमध्ये खरेदीसाठी 27 व 28 तारखेला काही सवलत देण्यात येणार आहे.