सोलापूर - शहरात पी 1, पी 2 हा नियम रद्द करण्यात आला आहे. आठवड्यातील सहा दिवस सर्व दुकाने खुली ठेवण्यास सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने मंजुरी दिली आहे. मंगळवारी संध्याकाळी सोलापूर महापालिकेत याबाबत बैठक संपन्न झाली. बैठकीनंतर आयुक्त पी शिवशंकर यांनी माहिती दिली. या निर्णयामुळे व्यपारी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पी 1, पी 2 म्हणजेच सम विषम तारखांचा घोळ संपला असून सर्व दुकाने आठवड्यातील सहा दिवस खुली ठेवण्यात येणार आहे. सम विषम तारखानुसार व्यापार करता येत नाही, आणि ग्राहकांना व व्यापाऱ्यांना या पी 1 ,पी 2 चा मोठा फटका बसत होता. याची नाराजी व्यापारी वर्गातून व्यक्त करण्यात येत होती. वाढती रुग्णसंख्या पाहता प्रशासनाने हा निर्णय घेतला होता. अनेक व्यपाऱ्यांनी या निर्णयाला विरोध करत नाराजी व्यक्त केली होती.
23 मार्चपासून संपूर्ण भारतात टाळेबंदी लागू करण्यात आली होती. 72 दिवसांच्या विश्रांतीनंतर अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली होती. पण त्यात पी 1 ,पी 2 ही नियमावली आली होती. अनेक व्यापाऱ्यांना तर या सम विषम तारखांचा घोळच समजत नव्हता. शहरातील मुख्य बाजारपेठेमध्येदेखील ही नियमावली लागू करण्यात आली होती. चेंबर ऑफ कॉमर्स, गाळे धारक संघटनांनी या नियमावलीला विरोध करत जिल्हा प्रशासनाला निवेदने दिली होती.
मंगळवारी सायंकाळी सोलापूर महानगरपालिका कार्यालयात या नियमावलीवर बैठक झाली. ही बैठक महापौर श्रीकांचना यंनम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी महानगरपालिका आयुक्त पी शिवशंकर, चेंबर ऑफ कॉमर्सचचेकॉमर्सचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.
या बैठकीस पी 1 ,पी 2 या नियमावलीला विरोध करण्यात आला. त्यामुळे आयुक्तांनी ह्या नियमावलीत शिथीलता आणून सम विषम या तारखांना दुकाने खुली राहतील हा निर्णय रद्दबातल ठरवत, आठवड्याच्या सर्व दिवशी दुकाने खुली राहतील, असा निर्णय घोषित केला. तसेच रविवारी सुट्टीदेखील घोषित केली. सुट्टीच्या दिवशी अत्यावश्यक सेवांना सूट राहील अशीही माहितीही यावेळी देण्यात आली. त्याचबरोबर दुकानदारांनी सोशल डिस्टन्स पाळणे बंधनकारक आहे. वेळोवेळी हँड सानिटायझरचा उपयोग, मास्क हे नियम पाळणे बंधनकारक असल्याची माहिती दिली.