सोलापूर - ज्यांना कुटुंब चालवायचा अनुभव नाही, त्यांनी दुसऱ्याच्या परिवाराची पर्वा करू नये, अशी बोचरी टीका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे. ते सोलापुरात राष्ट्रवादी भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ध्याच्या दौऱ्यात शरद पवारांच्या कुटुंबावर वैयक्तिक टीका केली होती. त्या टीकेचा समाचार घेताना पवारांनी मोदींना शेलक्या शब्दात लक्ष्य केले. त्या बरोबरच गांधी परिवारावर पंतप्रधानाकडून होणाऱ्या वैयक्तिक टीकेला प्रत्युत्तर देताना, पदाची आब राखली जात नाही, कारण ती त्यांची संस्कृती नसल्याचेही पवार म्हणाले. पवारांनी एक प्रकारे पुन्हा एकदा गांधी परिवाराची पाठराखण करत नव्या समिकरणाचे संकेत दिले आहेत.