सोलापूर - आरटीओ कार्यालयातील काम करणाऱ्या सहाय्यक रोखपालाने 5 लाख 92 हजार रुपयांच्या शासकीय रकमेवर डल्ला मारल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. विजापूर नाका पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. उदय दत्तात्रय गुरव (रा. शाहूपुरी, सातारा), असे संशयित आरोपीचे नाव आहे.
मोटार वाहन निरीक्षक आशिष अनिल पराशर( वय 40 रा मंत्री चंडक, विजापूर रोड, सोलापूर) यांनी तक्रार दाखल केली आहे. आशिष पराशर हे सोलापूर आरटीओ कार्यालयात मोटार वाहन निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यालयातील रोखपाल हे शासकीय कामकाज करत असताना गैरवर्तणूक करत होते. तसेच त्यांचे कामकाज संशयास्पद होते. त्यांची अधिक चौकशी केली असता त्याने शासकीय रकमेचा अपहार केल्याचे समोर आले. मोटार वाहन निरीक्षक आशिष पराशर यांनी रोखपाल यांचे दफ्तर तपासले. त्यामध्ये 5 लाख 92 हजार 600 रुपयांचा घोळ निदर्शनास आला.
आरोपी उदयगुरव यांनी शासनाची रक्कम 5 लाख 92 हजार ही रक्कम शासनाच्या तिजोरीत न भरता परस्पर विल्हेवाट लावली आहे. तसेच हा अपहार उघसकीस येऊ नये किंवा वरीष्ठ अधिकऱ्यांंच्या निदर्शनास येऊ नये यासाठी आरोपीने पावती पुस्तक दडवून ठेवले आहे, अशी नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेटे करत आहेत.