सोलापूर - गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोलापूरच्या कल्याणनगर परिसरात पावसाचे पाणी घरात शिरल्यामुळे नागरिकांचे संसारोपयोगी साहित्य पाण्यात बुडाले. यामध्ये नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान नागरिकांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी भर पावसात संभाजी ब्रिगेडच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात घुसून नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांना महापालिकेच्या वतीने तात्काळ नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी यावेळी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष शाम कदम यांनी केली. गेल्या आठ ते दहा वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. प्रत्येकवेळी मोठा पाऊस झाल्यावर या परिसरात नागरिकांच्या घरात पाणी घुसते, त्यात त्यांचं मोठं नुकसान होतं, मात्र याकडे कोणीही लक्ष देत नाही. या परिसराकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. असा आरोपही यावेळी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला.
दरम्यान विजापूर नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ, महानगरपालिकेचे इंजिनिअर बिराजदार, झोन अधिकारी शिंदे यांनी तात्काळ या ठीकाणी येऊन पाहणी केली व प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर रास्तारोको मागे घेण्यात आला. या आंदोलनात स्थानिक नागरिक देखील मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.