सोलापूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमे शेजारी पालकमंत्री दत्ता भरणे चप्पल घालून बसले, ही महापुरुषाची एक प्रकारे विटंबना आहे. असे म्हणत पालकमंत्री भरणे यांच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन करुन त्यांचा निषेध करण्यात आला आहे. ही घटना सहा मार्चला घडली असून आंदोलकांवर आठ मार्च रोजी फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण
पालकमंत्री दत्ता भरणे आणि काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत रविवारी 6 मार्च रोजी सकाळी नॉर्थकोर्ट प्रशाला येथील मैदानावर संविधान भवन सुशोभकरणाचा कार्यक्रम झाला. यावेळी पालकमंत्री भरणे हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर मंचावर पादत्राणे पायात ठेवून बसलेले होते. त्यांचे हे छायाचित्र समाज माध्यमावर प्रसारीत झाल्यानंतर आंबेडकरी जनतेतून रोष व्यक्त झाला.
पालकमंत्री भरणे यांच्या निषेधार्थ सहा मार्च रोजी सायंकाळी सोलापुरातील बुधवार पेठ येथील थोरला राजवाडा येथील नागरिकांनी पालकमंत्र्यांच्या प्रतिमेला जोडे मारून भरणे यांचा निषेध केला. दरम्यान, या आंदोलकांवर फौजदार चावडी पोलीस ठाणे येथे आठ मार्च रोजी आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
नागनाथ रणखांबे, जाई सोनवणे, पृथ्वीराज सरवदे, शिवम सोनकांबळे यांच्यासह अनेकांवर आपत्ती व्यवस्थापनाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.