सोलापूर - केंद्र सरकार घेत असलेल्या वेगवेगळ्या तुघलकी निर्णयाविरोधात मध्य रेल्वे मध्ये काम करणाऱ्या स्टेशन मास्तरांनी एक दिवस उपवास किंवा 12 तास न जेवता काम करत केंद्र सरकारचा निषेध केला आहे. भारतातील 35 हजार स्टेशन मास्तरांनी शनिवारी 31ऑक्टोबरला केंद्र सरकार विरोधात एक दिवसांचा उपास ठेवला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वे मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रात्रभत्ता मिळत होता.पण गेल्या महिन्या मध्ये शासनाचा निर्णय आला असून यापूढे रात्रभत्ता मिळणार नाही. 2017 पासून मिळालेला रात्रभत्ता पुढील वेतनातून कपात केला जाणार आहे. हा निर्णय चुकीचा असून तुघलकी निर्णय आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. आम्ही या निर्णयाविरोधात एक दिवस न जेवता 12 तास काम करत असल्याची माहिती यावेळी संजय अर्धापुरे (स्टेशन मास्तर ) यांनी दिली.
कोरोना काळात अनेक रेल्वे कर्मचारी कोरोना आजाराचे बळी पडले आहेत. पण रेल्वे शासन फक्त रेल्वेमधील आरोग्य कर्मचाऱ्यांना 50 लाख रुपयांची नुकसानभरपाई देत आहे. इतर रेल्वे कर्मचाऱ्यांना कोरोना इन्शुरन्स दिला जात नाही. परंतु अनेक रेल्वे कर्मचारी थेट प्रवाशांच्या संपर्कात येतात आणि त्यांना देखील ड्युटी करत असताना कोरोना विषाणूची लागण होत आहे. त्यांना काहीही सुरक्षा देण्यात आली नाही. रेल्वे प्रशासन वेगवेगळ्या प्रकारे रेल्वे विभागाचे खासगीकरण करत आहे. या तुघलकी निर्णयांचा विरोध करत असल्याची माहिती आंदोलकांनी यावेळी दिली.
उपोषणात सहभागी
सोलापूर डिव्हिजन- 480 स्टेशन मास्तर
सोलापूर डिव्हिजन-78 स्टेशन
पूर्ण भारतात - 35 हजार स्टेशन मास्तर