सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील शाळा सुरू होऊन तब्बल 20 दिवस झाले तरी गोर गरीब विद्यार्थ्यांना अजूनही गणवेश वितरित केले नाही. नवीन पीएफएमएस प्रणालीमुळे ( PFMS system ) पैसे पाठविण्यास तांत्रिक अडचणी येत असल्याने बॅंकांनी हाथ झटकले आहेत. त्यामुळे अद्याप एकाही विद्यार्थ्याला शासनाचा गणवेश मिळाला नाही. सद्यस्थितीत गरजू, गोरगरीब विद्यार्थी विना गणवेशाने शाळेत येत असल्याची परीस्थिती निर्माण आहे. सोलापूर जिल्ह्यात 2892 शाळेतील 1 लाख 48 हजार विद्यार्थ्यांना शासनाच्या भोंगळ कारभारामुळे गणवेशापासून वंचित राहावे लागले आहे. शासनाकडून निधी मिळूनही शासनाच्या लालफित शाहीमुळे विद्यार्थ्यांच्या गणवेशाचा खोळंबा झाल्याचे दिसून येत आहे.
गणवेशासाठी साडेआठ कोटींचा निधी तांत्रिक अडचणीत अडकला - जिल्हास्तरावर, तालुका स्तरावर नवीन गणवेश खरेदीसाठी शासनाकडून 8 कोटी 43 लाखांचा निधी वितरीत झाला आहे. मात्र, पब्लिक फायनान्स मॅनेजमेंट सिस्टिम ( PFMS system ) प्रणालीतून शाळा व्यवस्थापन समित्यांना निधी वितरीत करण्यात अडचण निर्माण झाली आहे.जवळपास दीड लाख विद्यार्थी विना गणवेशात शाळेत येत आहे.राज्यातील कोणत्याही शाळा व्यवस्थापन समित्यांपर्यंत गणवेशाची रक्कम पोहचलेली नाही.
समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत गणवेश वाटप - जिल्ह्यातील एकाही विद्यार्थ्याला गणवेश मिळालेला नाही. मात्र काही शाळेतील शिक्षकांनी स्वखर्चाने विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप केले. समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत शालेय गणवेश या योजनेतून दरवर्षी पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना दिले जाते. यामध्ये सर्व मुलींसह अनुसूचित जाती-जमातीतील मुले, दारिद्रय रेषेखालील मुलांना प्रत्येकी दोन गणवेश दिले जातात. एका गणवेशासाठी प्रत्येकी ३०० रुपयांप्रमाणे दोन गणवेश दिले जातात.
हेही वाचा - Governor Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर