सोलापूर - मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज 4 जुलै रोजी आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता. पोलिसांनी परवानगी दिली नसल्याने या मोर्चाला हिंसक वळण लागते की काय अशी भीती होती. पण आयोजकांनी शांततेत मोर्चा मार्गस्थ केला. मात्र 11 वाजता निघणारा मोर्चा दोन तास उशिरा निघाला. भाजपाचे सर्वच नेते, आमदार-खासदार उपस्थित होते. अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
महामार्गावर अनेक मराठा बांधवाना रोखल्याने महामार्ग जाम
जुना पुणे नाका येथून आक्रोश मोर्चा निघणार असल्याने जिल्ह्यातील तालुक्यातील अनेक मराठा बांधव सोलापूर शहराकडे येत होते. पण पोलीस प्रशासनाने त्यांना अडविले त्यामुळे आंदोलकांनी रस्त्यावर ठिय्या मांडला होता. संभाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आक्रोश मोर्चातील आंदोलकांनी मोर्चा काढण्यात येणार नाही, आमच्या सर्व मराठा बांधवाना सोडण्यात यावे अशी भूमिका घेण्यात आली. त्यावेळी पोलिसांनी मोर्चाकडे येणारे सर्व वाहने आणि मुख्य नेत्यांना सोडण्यात आले. दोन तासांनी हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्थान झाला.
मोर्चामध्ये भाजपा नेत्यांची गर्दी
मराठा क्रांती मोर्च्याच्या आक्रोश मोर्चाला भाजपाच्या नेत्यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवली होती. भाजपाचे रणजीतसिंह नाईक निंबाळकर, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत, प्रशांत परिचारक, खासदार जय सिद्धेश्वर महाराज महास्वामी, आमदार विजयकुमार देशमुख, विधानपरिषदेचे आमदर रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार समाधान अवताडे आदींची उपस्थित होती.
हेही वाचा - जेवढ्या अफवा पसरवल्या जातील तेवढे आम्ही मजबूत होऊ- राऊत