सोलापूर - ग्राहकांच्या सुविधेसाठी राष्ट्रीयकृत बँकांमधील कामकाजाच्या वेळेत बदल करण्यात आली आहे. 1 नोव्हेंबर 2019 पासून राष्ट्रीयकृत बँकांची वेळ सकाळी 11 ते सायंकाळी 5.00 असणार आहे. तसेच निवासी क्षेत्रात असलेल्या शाखा सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत चालू राहणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक संतोष सोनवणे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य बँकर समितीने राष्ट्रीयकृत बँकांच्या कामकाजाची वेळ निश्चित करण्यासाठी इंडियन बँक असोसिएशनने घेतलेल्या निर्णयाचे पालन राज्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकांनी करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे सोनवणे यांनी सांगितले.
पूर्वी ग्राहकांना सकाळी 10.30 ते सायं. 4 वाजेपर्यंत बँक सेवेचा लाभ घेता येत होता. आता या वेळेत या वाढ करण्यात आली असून, सकाळी 11 ते सांयकाळी 5 वाजेपर्यंत बँका सुरू राहणार आहेत.
व्यावसायिक तसेच निवासी आणि अन्य क्षेत्रातील बँकांच्या शाखेसाठी वेगवेगळे वेळापत्रक बनवण्यात आल्याचे संतोष सोनवणे यांनी सांगितले. सुधारित वेळापत्रकानुसार रहिवासी क्षेत्रातील बँकेच्या शाखांची वेळ सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असून, व्यावसायिक क्षेत्रातील मार्केटच्या ठिकाणी असलेल्या बँकांची वेळ सकाळी 11 ते सांयकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे. याचप्रमाणे इतर ठिकाणी असलेल्या शाखा आणि कार्यालये सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू असतील.