सोलापूर - ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळत नसेल तर ओबीसी नेते आणि मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांना तुम्ही राजीनामा द्यावा, तुम्ही सरकार मधून बाहेर पडावे, अशी मागणी माकप नेते आणि पद्मशाली समाजाचे नेते माजी आमदार आडम यांनी केली आहे. यावेळी बोलताना आडम मास्तर यांनी पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला आहे.
राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर ओबीसी समाज आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी आक्रमक झाला आहे. यासाठी राज्यभरातून बैठका आणि मोर्चाचे आयोजन केले जात आहे. अशाच प्रकारे मंगळवारी सोलापुरात ओबीसी आणि भटक्या विमुक्त जातींचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. सोलापुरातील ओबीसी समाजातील सर्व पक्षाच्या नेत्यांना आमंत्रित केले होते. पद्मशाली समाजाचे नेते व माजी आमदार नरसय्या आडम यांना देखील या मेळाव्यात उपस्थित राहण्याचे खास आमंत्रण दिले होते. त्यांनी आपल्या भाषणात बोलताना केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला धाऱ्यावर धरण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी वड्डेवारांच्या राजीनामाच्या मागणी केली.
भारताचे पंतप्रधान देखील ओबीसी-
माजी आमदार नरसय्या आडम यांनी भाजपावर थेट टीका केली. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केले आहे. इम्पिरिकल डाटा वेळेवर सादर न केल्याने हे आरक्षण रद्द झाले आहे. इम्पिरिकल डाटा सादर करण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवतेय तर केंद्रसरकार राज्याकडे बोट करत आहे. मात्र हा खेळ थांबवा, असे संतापजनक उद्गार काढत आडम पुढे म्हणाले की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील ओबीसी आहेत. त्यांनी या आरक्षणाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नये, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
तामिळनाडू मधील आरक्षणाला आजतागायत धक्का लागला नाही-
तामिळनाडू राज्यातील ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाला आजतागायत धक्का लागला नाही. त्या राज्यात ओबीसी समाजाला 69 टक्के राजकीय आरक्षण आहे. राज्याचे अधिकार केंद्र काढून घेत आहे, अशी टीका माजी आमदार आडम यांनी केली. राज्याला अधिकार देत असताना अर्धवट अधिकार का दिला? असा सवाल देखील या मेळाव्यात उपस्थित करण्यात आला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाल्या शिवाय होता कामा नये, अशी आवर्जून मागणी या मेळाव्यात करण्यात आली.