सोलापूर - शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात मंगळवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. विद्युत ताराचा स्पर्श ( One person killed by an electric shock ) होऊन एक ठार आणि एक गंभीर जखमी झाला आहे. विद्युत तारांना अडथळा होणाऱ्या झाडांच्या फांद्या तोडताना ही दुर्घटना घडली आहे. यामध्ये अजहर चांदसाब तांबोळी ( वय 24 वर्ष रा फॉरेस्ट रेल्वे लाईन सोलापूर ), हा गंभीर जखमी झाला असून रब्बानी शेख ( वय 39 रा. मोदी, सोलापूर ) या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. दोघांना सोलापुरातील अश्विनी या खासगी रुग्णालयात बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी दाखल केले होते. पण सायंकाळी उपचार सुरू असताना रब्बानी शेख या महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.
रेल्वे लाइन परिसरात घडली घटना : अजहर शेख व रब्बानी शेख हे दोघे मंगळवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास रेल्वे लाइन परिसरात हायड्रोलीक क्रेनमध्ये बसून झाडांच्या फांद्या तोडत होते. झाडांच्या आतमध्ये हाय व्होल्टेजच्या विद्युत तारा होत्या. यावेळी दोघांना वीज तारांचा जबरदस्त धक्का बसला. यामध्ये रब्बानी व अझहर यास विजेचा धक्का बसला. दोघेही जखमी अवस्थेत क्रेनमध्ये लटकले होते. त्यामुळे नागरिकांची एकच गर्दी होती. सदर बाजार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पण नातेवाईकांच्या आग्रहास्तव जखमींना उपचारासाठी अश्विनी या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचार सुरू असताना रब्बानी शेख यांचा बुधवारी 11 मे रोजी सायंकाळी उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.