सोलापूर - अवैधरित्या चालत असलेल्या डान्सबारवर एमआयडीसी पोलिसांनी रविवारी रात्री छापा टाकला आहे. यामध्ये एकूण 9 आरोपींना अटक केले आहे. यामध्ये तीन बारबाला देखील आहेत. लॉकडाऊन नंतर सोलापुरात छुप्या पद्धतीने बारबालांचा छम छम सुरू होता. अतिशय तोकडे कपडे घालून अश्लील नाच चालत असताना एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली.
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका खासगी घरात छुप्या पद्धतीने बारबालांचा नृत्य चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावर पोलीस लक्ष ठेवून होते. रंगेहाथ पकडून त्यांवर कारवाई करावयाची होती. रविवारी लक्ष्मी नारायण थिएटरच्या मागे असलेल्या एका घरात बारबालांचा नंगा नाच सुरू होता. तोकडे कपडे घालून या बारबाला नृत्य करत होत्या. तर 9 संशयित आरोपी हे पैसे उधळून त्यांसोबत नाचत होते. त्यामध्ये एक पोलिसांचा बनावट ग्राहक देखील होता. रविवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास पोलिसानी धाड टाकली. यावेळी तीन बारबाला नाच करताना आढळल्या तर बाकीचे आरोपी हे त्यांवर पैसे उधळून अश्लील इशारे करत नाचत होते.
![midc police arrested 9 accused for start dance bar at solapur](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-sol-02-illegle-dance-baar-police-take-action-10032_28092020174955_2809f_1601295595_39.jpg)
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी व पोलीस कर्मचारी या ठिकाणी पोहोचले. पोलिसांना पाहताच एकच धावपळ सुरू झाली होती. परंतू पळण्यासाठी दुसरीकडे जागाच नसल्याने सर्व आरोपी पोलिसांच्या अलगद ताब्यात आले. सर्व संशयित आरोपीना ताब्यात घेऊन रात्रीच पोलीस ठाण्यात आणले व गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये 5 मोटार सायकली, एक झायलो कार, मोबाईल फोन, रोख रक्कम असा 5 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
यामध्ये भारत पांडुरंग जाधव हा मुख्य आरोपी असून यावर सोलापुरातील विविध पोलीस ठाण्यात एकूण 18 गुन्हे नोंद असल्याची माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील यांनी दिली. रविवारी रात्री झालेल्या या कारवाईमध्ये जहीर रमजान सय्यद, शाहनवाझ इसाक शेख, मतीन महंमद रफिक शेख, राजू आनंद जाधव, अनिल सदाशिव खरटमल, सचिन सुरेश जाधव, रफिक नवाब शेख या नशेबाजावर कारवाई झाली आहे.
लॉकडाऊननंतर शहरात छुप्या पद्धतीने बारबालांचा डान्स
लॉकडाऊननंतर बारबालांनी खासगी घरांचा आधार घेतला आहे. लॉकडाऊन सुरू झाल्या पासून अनेक ऑर्केस्ट्रा बार बंदच आहेत. त्यामुळे या बारबालांवर उपासमारीची वेळ आली आहे. एजंटांमार्फत त्यांनी खासगी घरांचा आधार घेतला आहे. त्याठिकाणी मैफिल रंगत आहे. तोकडे कपडे घालून रात्रीचा छम छम सुरू झाला आहे. शहरातील विविध ठिकाणी असलेल्या अशा छुप्या डान्स बारवर कारवाई होणे देखील गरजेचे आहे.