सोलापूर - छत्रपती संभाजीराजे यांनी मुंबई येथील आझाद मैदानात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. संभाजीराजे यांना पाठिंबा देण्यासाठी सोलापुरातील सकल मराठा समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. राज्य सरकारकडे मराठा समाजाने काही मागण्या केल्या, पण आजतागायत त्या पूर्ण झाल्या नाहीत म्हणून संभाजी राजे यांनी उपोषणास सुरुवात केली आहे. राज्यभरातून सकल मराठा समाज आपापल्या जिल्ह्यात लाक्षणिक उपोषण करून संभाजीराजेना पाठिंबा देत आहेत.
प्रमुख मागण्या -
1. कोपरडीच्या गुन्ह्यातील गुन्हेगाराना झालेल्या शिक्षेची तात्काळ अंमलबजावणी करावी.
2. मराठा समाजास आरक्षण पूर्ववत होईपर्यंत ओबीसी घटकाच्या सर्व सवलती मराठा समाजास द्याव्या.
3. सारथी संस्थेस पूर्ण स्वायत्तता देऊन पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी निधीची तरदूत करावी.
4. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळास येणाऱ्या बजेटमध्ये जास्तीचा निधी उपलब्ध करावा.
5. मराठा समाजातील स्पर्धा परीक्षेतील रखडलेल्या नियुक्त्या तात्काळ कराव्यात.
6. प्रत्येक जिल्ह्यात मराठा मुलामुलींसाठी कायमस्वरुपी वसतिगृहे उभारून पुरेसा निधी उपलब्ध करावा.
7. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून झालेल्या आंदोलनादरम्यान दाखल केलेले सरसकट गुन्हे मागे घ्यावे.
8. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती मदत देऊन कुटुंबातील एकास शासकीय नोकरी देणे.
9. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक तात्काळ उभारण्यात यावे.
अशा विविध मागण्या घेत सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समाजाने लक्षणिक उपोषण केले. यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाजातील नेते उपस्थित होते.
मराठा समाजाचा उद्रेक झाल्यास प्रशासन जबाबदार राहील -
मराठा समाजासाठी गेल्या अनेक वर्षांपासून मागण्या केले जात आहेत. छत्रपती संभाजीराजे यांच्या आमरण उपोषणास अखिल भारतीय मराठा सेवा संघ, मराठा आरक्षण समनव्य समितीमधील 42 संघटना, मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज यांनी जाहीर पाठिंबा देऊन सक्रिय सहभाग नोंदवित आहेत. आंदोलनादरम्यान मराठा समाजाचा उद्रेक झाल्यास त्यानंतर निर्माण होणाऱ्या संपूर्ण परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा - Solapur Administration Agitation : कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन; जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाज ठप्प