सोलापूर - शरण कांबळे याने आपल्या जिद्दीच्या जोरावर आणि अभ्यासक्रमच्या बळावर यूपीएससी मार्फत घेतलेल्या केंद्रीय पोलीस दलात देशात आठवा क्रमांक प्राप्त करून सोलापूर जिल्ह्याचे नाव चमकवले आहे. बार्शी तालुक्यातील तडवळे हे गाव देशपातळीवर गेल्याने सर्व स्तरातून शरण कांबळेचे कौतुक केले जात आहे.
शरणची हुशारी पाहून त्याला शिकविण्यासाठी आईने भाजीपाला घेऊन गल्लोगल्ली फिरून विक्री केला. तर त्याचे वडील शेतमजूर म्हणून आयुष्यभर राबले. "थोरला मुलगा हा पुण्यात नोकरी करत होता. शरणला स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी दिल्लीत ठेवले. आमच्या कष्टाची जाणीव ठेवून शरणच्या जिद्दीपुढे परिस्थितीने ही शरणागती पत्करली," अशी भावना शरणच्या मातापित्यांनी व्यक्त केली.
अत्यंत हलाकीच्या परिस्थितीत मुलाच्या शिक्षणाकडे लक्ष दिले-
बार्शी तालुक्यातील तडवळे येथील गोपीनाथ कांबळे आणि सुदामती कांबळे यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शरणच्या शिक्षणाकडे लक्ष दिले. दिवसभर दुसऱ्याच्या शेतात शेतमजुरी करून, रात्री कडबा काढण्याची सुगी करून तसेच अनेक काम घेऊन एक-एक रुपया जोडून शरणला शिकवले. तर वेळप्रसंगी हात उसने घेऊन मुलांच्या शिक्षणाला पैसे पुरवल्याचे शरणच्या मातापित्यांनी सांगितले.
दोन्ही मुलांनी कष्टाच फळ दिलं-
काही झालं तरी मुलांच्या शिक्षणाला पैसा कमी पडू द्यायचा नाही, असे कांबळे दाम्पत्याने ठरवले होते. थोरला मुलगा दादासाहेब बीटेक (अभियंता) झाला आहे. तो पुण्यातील एका खासगी सॉफ्टवेअर कंपनीत वार्षिक दहा लाखांचे पॅकेज घेऊन अभियंता म्हणून कार्यरत आहे. तर दुसरा शरण यूपीएससी परीक्षेत देशात आठवा आला आहे.
माझा मुलगा साहेब झाला-
मला माझा मुलगा काय शिकला हे माहीत नाही. पण साहेब झाला एवढे मात्र कळते, अशी भोळी भाबडी प्रतिक्रिया शरणची आई सुदामती कांबळे यांनी दिली आहे. परस्थिती बदलाच्या चमत्कार फक्त शिक्षणातूनच घडू शकतो. यावर ठाम विश्वास व्यक्त केला. कांबळे कुटुंबीयांनी काबाडकष्ट करून मुलांना शिकवलं आणि मुलांनी आई-वडिलांच्या कष्टचे सोन केलं. याचा कांबळे कुटुंबीयांना अभिमान आहे, असे कांबळे दाम्पत्यांनी माध्यमांना सांगितले.
हेही वाचा- भारतरत्नांची चौकशी घरी जाऊन नाही, केवळ ट्विटची माहिती घेणार - छगन भुजबळ