सोलापूर - पुलवामा हल्ल्यात मृत पावलेल्या सीआरपीएफ जवानांना मोदी सरकारने अद्याप शहिदांचा दर्जा दिलेला नाही. मग कुठे आहे त्यांचा राष्ट्रवाद ? असा सवाल काँग्रेसचे युवा नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी उपस्थित केला. महाआघाडीचे लोकसभेचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारासाठी सोलापुरात व्यापारी आणि उद्योजकांशी संवाद आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ज्योतिरादित्य यांनी भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
काँग्रेसचे स्टार प्रचारक जोतिरादित्य शिंदे यांनी शनिवारी सोलापुरात व्यापारी आणि उद्योजकांबरोबर आर्थिक स्थिती आणि सरकारच्या धोरणावर थेट संवाद साधला. त्यांनी थेट लोकात मिसळून व्यापारी उद्योजकांना अडचणी जाणून घेतल्या. तसेच भाजपप्रणित सरकारच्या धोरणांवर टीका केली. यावेळी शिंदे यांनी जीएसटी, पेट्रोलियम पदार्थावरील कर परतावा, व्यवसायात असणारा फायदा व तोट्याचा ताळमेळ या सर्व समस्यांवर चर्चा केली. काँग्रेसने घेतलेल्या बैठकीला व्यापाऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.
दोनच दिवसांपूर्वी भाजपचे नेते तथा केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी शहरातील व्यापारी उद्योजकांशी अशाच प्रकारचा संवाद साधला होता. त्या तुलनेत ज्योतिरादित्य शिंदे यांच्या थेट व्यापाऱ्यांत मिसळून साधलेल्या संवादाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसले. जीएसटीचे किचकट नियम आणि इतर कारणामुळे नाराज असलेल्या व्यापाऱ्यांना काँग्रेसच्या बाजुने वळविण्यासाठी ही बैठक घेण्यात आली होती.