सोलापूर - शहर व जिल्ह्यात कडक निर्बंध लागू झाल्यापासून गोरगरीब आणि कष्टकरी वर्गाचे आतोनात हाल होत आहेत. सोलापूर शहरात जवळपास 30 ते 40 हजार महिला विडी उद्योगावर अवलंबून आहेत. विडी कामगार, यंत्रमाग कामगार, असंघटीत कामगार, बांधकाम कामगार, रिक्षा चालक आदी वर्गातील गोरगरीब नागरिक आमदार प्रणिती शिंदे यांच्या सोलापूर शहर मध्य या मतदार संघात वासत्यव्यास आहेत. टाळेबंदी झाल्यापासून आतापर्यंत ना आमदार आले, ना खासदार आले. काही स्थानिक राजकीय नेते आले आणि थोडी फार मदत करून फोटो काढून गेले. पण, एका दिवसावर चालत नाही. आम्हाला मदत किंवा भिक नको, आमचे काम करू द्या व आमचे पोट भरू द्या, अशी मागणी यावेळी विडी कामगार महिलांनी केली.
भुकेने मरण्यापेक्षा कोरोना आजाराने मरू
गेल्या वर्षी तब्बल 3 महीने टाळेबंदीत काढले. त्यावेळी अनेक दानशूर व्यक्तींनी मदत केली होती. पण, यंदाच्या कडक निर्बंधामुळे अनेकांचे कंबरडे मोडले आहे. आता मदतीसाठीही कोणी पुढे येत नाहीत. आता भुकेने मरण्याची वेळ आमच्यावर आली आहे. त्यामुळे भुकेने मरण्यापेक्षा कोरोनाने मरू, अशी व्यथा विडी कामगार महिलानी व्यक्त केली.
शहरातील कोरोना स्थिती
सोलापूर शहरात सोमवार (दि. 9 मे) 170 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ झाली असून 9 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या सोलापूर शहरात 1 हजार 472 सक्रिय रुग्ण असून शहरातील विविध ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा - सोलापुरात रेशन दुकानावर नागरिकांच्या लांबच लांब रांगा