पंढरपूर - देशातील सर्वात मोठा सण उत्सव म्हणून दिवाळी सण साजरा केला जातो. या दिवाळीत अकलूज येथील यशवंत नगर येथे राहणाऱ्या देशमुख कुटुंबियांनी सर्व धर्म समभाव असणारा आकाश कंदील तयार केला आहे. त्यातून त्यांनी दिवाळीसारख्या सणातून सर्वधर्मसमभाव जपण्याचा संदेश दिला आहे.
मानवतेचा संदेश देण्याचा प्रश्न -
सेवानिवृत्त शिक्षक मोहनराव देशमुख यांनी सणावाराला जनजागृती करण्याचे काम करतात. यामध्ये त्यांना त्यांच्या कुटुंबातील उच्च शिक्षित सदस्यही साथ देतात. गणपती सणातील गौराई समोरील देखावे असतील किंवा दिवाळी सारख्या सणातून समाजाला एक संदेश देण्याचे काम देशमुख कुटुंबियांनी केले आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये देशमुख कुटुंबियांनी कोरोना महामारी कोरोना योद्धांचा देखावा सादर केला होता. तर यावर्षी ऑलिम्पिक विजेत्या संघाचा देखावा त्यांनी गौऱ्याच्या समोर ठेवला होता. ह्यातून एक प्रकारचा मानवतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करत असल्याचेही मोहनराव देशमुख यांनी सांगितले आहे.
सर्व धर्म समभाव दाखवण्याचा प्रयत्न -
हिंदू परंपरेनुसार दिवाळी सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी प्रत्येक घरामध्ये आकर्षक अशा आकाश दिव्यांचा वापर केला जातो. देशमुख कुटुंबियांनी स्वतःच्या हाताने तयार केलेला सर्व धर्म समभाव दाखवणारा आकाश कंदील तयार केला आहे. यामध्ये मुस्लीम बांधवांच्या प्रार्थना स्थळाचे चित्र दाखवले आहे. त्याचप्रमाणे ख्रिस्ती बांधवांचे चर्च तर शिख समुदायाचे गुरुद्वारा आकाश कंदीलवर साकारण्यात आला आहे. तर हिंदू परंपरेतील मंदिरालाही आकाश कंदीलाच्या एका बाजूस दाखवण्यात आले. आकाश कंदिलाच्या चारही बाजूंनी अशा पवित्र प्रार्थना स्थळांची चित्र दाखवण्यात आली आहे.