सोलापूर - राज्यात गुटखा बंदी आहे. असे असताना देखील गुटखा आणि सुगंधित तंबाकूची विक्री होत असल्याचे पुढे येते. सोलापुरात यास लगाम लावण्यासाठी अन्न व औषध प्रशासन, पोलीस यांनी छापे टाकून गुटख्याचा साठा जप्त केला आहे. अन्न व औषध प्रशासन, शहर आणि ग्रामीण पोलीस प्रशासनाने वर्षभरात एकूण 138 धाडी टाकून 3 कोटी 94 लाख 11 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये 105 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर, 80 आस्थापना सील करण्यात आल्या, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रदीप राऊत यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.
हेही वाचा - ujani dam water : कुंकवाच्या पाण्याने केला पालकमत्र्यांच्या प्रतिमेचे जलाभिषेक
सोलापूर ग्रामीण पोलिसांनी नुकतीच मोठी कारवाई केली आहे. पावणे दोन कोटींचा गुटखा व तंबाकू साठा सोलापूर हद्दीत जप्त केला आहे. सोलापुरात गेल्या वर्षभरात कोट्यावधी रुपयांचा बेकायदेशीर तंबाकू व गुटखा साठा जप्त करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या उद्दिष्टापेक्षा अधिक काम - सोलापूर अन्न व औषध प्रशासन विभागाला 750 आस्थापना तपासणीचे उद्दिष्ट दिले होते. उद्दिष्टापेक्षा अधिक काम सोलापूर अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे. गेल्या वर्षभरात 787 अस्थापनांची तपासणी करून 113 जणांना नोटीस बजावल्या आहेत. तर, 8 आस्थापनाच्या त्रुटी अद्यापही दूर केल्या नाहीत म्हणून त्यांचे परवाने रद्द केले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाकू महाराष्ट्र राज्यात उत्पादन आणि विक्रीला बंदी असताना सोलापूरच्या सीमावर्ती भागातून मोठ्या प्रमाणात बेकायदा गुटखा, सुगंधित तंबाकू आणून विक्री व वाहतूक केली जाते.
वर्षभरात 4 कोटींचा गुटखा साठा जप्त - सोलापूर अन्न व औषध प्रशासन, सोलापूर शहर आणि ग्रामीण पोलीस प्रशासन यांनी केलेल्या विविध कारवाईत सोलापूर शहर आणि जिल्ह्यात आजतागायत 138 ठिकाणी धाडी टाकून गुटखा आणि सुगंधित तंबाखू साठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये 4 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच, 42 गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त केलेल्या गाड्यांची किंमत 1 कोटी 70 लाख 5 हजार रुपये आहे. या गाड्यांच्या चालकांचे परवाने रद्द करण्याची कारवाई आरटीओ कार्यालयाकडून चालू आहे.
नुकतेच पावणे दोन कोटींचा गुटखा व तंबाकू साठा जप्त - सोलापूर ग्रामीण भागातील तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई करत पावणे दोन कोटींचा गुटखा साठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये गुटखा व तंबाकूची पोते आढळले आहेत. हा मुद्देमाल दोन कंटेनरमधून कर्नाटक राज्यातून वाहतूक करत सोलापूर मार्गे महाराष्ट्र राज्यातील इतर जिल्ह्यात विक्रीसाठी जात होता. मात्र, सोलापूर तालुका पोलिसांनी कारवाई करत हा सर्व मुद्देमाल व दोन कंटेनर, असा पावणे दोन कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे.
हेही वाचा - Nurses Strike in Solapur : सोलापुरातील परिचारिकांचे कामबंद आंदोलन; शासकीय रुग्णालयातील रुग्णसेवा ठप्प