सोलापूर- शहराच्या पूर्व भागातील मार्कंडेय सहकारी रुग्णालयात बंद असलेल्या एका गॅस टाकीचा मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे जोरात आवाज आला आणि रुग्णालयामध्ये आणि आजूबाजूच्या वस्तीमध्ये पांढऱ्या रंगाची पावडर बाहेर फेकली गेली. एकीकडे जोरात स्फोट आणि दुसरीकडे सर्वबाजूने पांढरी पावडर पसरल्याने रुग्णांच्या नातेवाईकांत भीतीचे वातावरण पसरले होते. प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी आणि अग्निशमन दलाचे अधिकारी कर्मचारी यांनी तात्काळ घटना स्थळी धाव घेत गॅस टाकीवर पाण्याचा फवारा केला आणि गरम झालेल्या गॅस टाकीला थंड केले. रुग्णांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी हॉस्पिटल प्रशासन आणि स्थानिक प्रशासन यांची एकच धावपळ झाली.
रुग्णालयाच्या आवारात आहे ऑक्सिजन प्लांट -
पूर्व भागातील मार्कंडेय सहकारी रुग्णालयात ऑक्सिजनच्या दोन मोठ्याटाक्या आहेत. या टाक्यांमध्ये ऑक्सिजनचा साठा केला जातो. एक टाकी गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. बुधवारी रात्री 11च्या सुमारास रुग्णालयात असलेल्या टाकीचा मोठा स्फोट झाला.
गॅस टाकी मधून पांढरी पावडर विखुरली आणि श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला-
ऑक्सिजन साठा करणाऱ्या गॅस टाकीचा भयंकर अशा आवाजाने मोठा स्फोट झाला. यामधून पांढरी रासायनिक पावडर सर्व ठिकाणी पसरली होती. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना तात्काळ पाचारण करून दोन बंब पाण्याचा फवारा मारण्यात आला. यामुळे गरम झालेली गॅस टाकी थंड झाली. मात्र, पांढऱ्या पावडर मुळे रुग्णांच्या नातेवाईकांना श्वास घेण्याचा त्रास सुरू झाला. डोळ्यात आग पडू लागली होती.
कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही-
गॅस टाकीच्या स्फोटामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती मनपा आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली. मात्र, अतिदक्षता विभागातील रुग्णांना मात्र दुसऱ्या इमारतीत हलवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.