सोलापूर - सोलापूर शहराच्या मधोमध असलेल्या उज्जीवन मायक्रो फायनान्स म्हणजेच बचत गट देणाऱ्या फायनान्स ऑफिससमोर फायनान्स कर्मचारी आणि लोन मागण्यासाठी आलेल्या ग्राहकांत फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. पार्क चौकात असलेल्या मुख्य रस्त्यावर ही हाणामारी झाली आहे. याबाबत फायनान्स कर्मचारी आणि ग्राहक यांनी एकमेकांविरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे एपीआय विष्णू गायकवाड यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थिती आटोक्यात आणली.
व्यवस्थापकाने शिवीगाळ केल्याचा आरोप-
भोसले नामक व्यवस्थापकाने लोनची फाईल रिजेक्ट करून शिवीगाळ केल्याचा आरोप ग्राहकाने केला आहे. या शिवीगाळ केल्याचा जाब विचारण्यासाठी गेले असता भर रस्त्यावर ही हाणामारी झाली आहे. रस्त्यावर जाणाऱ्या नागरिकांनी फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. अमर बोडा आणि चंद्रशेखर बोडा अशी ग्राहकांची नावे आहेत. उज्जीवन फायनान्सच्या अधिकाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. याबाबत फौजदार चावडी पोलीस ठाण्यात जाबजबाब नोंदवण्याचे काम सुरू होते.
ग्राहकांत आणि फायनान्स कर्मचाऱ्यांत हाणामारीने सोलापुरात एकच चर्चा-
पार्क चौक ते एस.टी स्टॅण्डकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मायक्रो फायनान्स कार्यालयासमोर झालेल्या फ्री स्टाईल हाणामारीमुळे सोलापुरात एकच चर्चा सुरू होती. अशा मायक्रो फायनान्स मधून बचत गटाच्या माध्यमातून छोटी छोटी कर्ज प्रकरणे मंजूर केली जातात. आणि सक्तीने कर्ज वसुली केली जाते. अरेरावीची भाषा वापरत करत वसुली फायनान्स किंवा बचत गटाचे हप्ते वसुली केली जातात अशी चर्चा पहावयास मिळाली. पवन पाटील या सामाजिक कार्यकर्त्याने तर बचत गटवाल्यावर कडक कारवाईची मागणी केली आहे.