सोलापूर - माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापुरातील पेट्रोलपंपावर मोफत पेट्रोल देण्यात येत आहे. त्यामुळे सात रस्ता येथील कारागीर पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी गर्दी झाली होती. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान महागाईत 501 रुपयांचे पेट्रोल मोफत दिल्यामुळे सुशीलकुमार नामक ग्राहक खुश झाले होते.
पोलीस कारवाईकडे लक्ष
सोलापूर महानगरपालिकेतील काँग्रेसच्या नगरसेविका फिरदोस पटेल यांनी पेट्रोल मोफत मिळणार असल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल केली होती. त्यामुळे ही गर्दी झाली. आता पोलीस प्रशासन याकडे बघ्याची भूमिका घेतात की कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. कारण यापूर्वी आमदार प्रणिती शिंदे यांनी महागाईविरोधात पेट्रोलपंपावर आंदोलन केले होते, त्यावेळी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता
सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त योजना
सोलापूर महानगरपालिकेतील नगरसेविका फिरदोस पटेल यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त योजना राबविली होती. ज्या व्यक्तींचे नाव सुशीलकुमार किंवा सुशील आहे, त्यांनी आधार कार्ड दाखवून 501 रुपयांचे पेट्रोल मोफत वाहनात भरून जावे, असे आवाहन केले होते. त्यामुळे सुशीलकुमार किंवा सुशील नाव असणाऱ्या व्यक्तींनी सात रस्ता येथील पेट्रोलपंपावर गर्दी केली होती. काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश वालेदेखील या कार्यक्रमात सहभागी झाले होते. पेट्रोल मोफत मिळत असल्याने वाहनधारक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
राजकीय पक्षांकडून जबाबदारीची अपेक्षा
सोलापूर शहरातील स्थानिक प्रशासन कोरोना परिस्थितीवर हळूहळू नियंत्रण प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहे. पण जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोना रुग्णसंख्या आजही नियंत्रणाबाहेर आहे. सद्यस्थितीत शहरात डेंग्यूमुळे बेड फुल्ल होत आहेत. लहान व अल्पवयीन मुलांना डेंग्यू किंवा फिवरमुळे रुग्णालयात अॅडमिट करण्याची वेळ पालकांवर आली आहे. अशा स्थितीत सर्वच पक्षांनी जबाबदारीने आणि नियमाने वागायवा हवे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.