सोलापूर - थकीत वीज बिल वसुलीसाठी महावितरणने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन बंद करण्यास सुरुवात केली आहे. वीज बिल थकीत असलेल्यांचा विद्यूत पुरवठा वैयक्तीक खंडीत न करता थेट डीपीमधून खंडीत केला जात आहे. त्यामुळे वीज बिल भरलेल्या इतर शेतकऱ्यांना त्याचा नाहक त्रास होत आहे. तसेच कोरोना महामारीने शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला असताना वीज बिल वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी आमदार दिलीप माने यांनी दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांसह सोमवारी (7 मार्च) वीज महावितरणच्या मुख्य कार्यालयात सकाळी दहाच्या सुमारास दाखल झाले. सर्व शेतकरी अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांच्या कार्यालयात दाखल झाले. दिलीप माने यांनी कोणताही वाद न घालता वीज सुरू करावी, अन्यथा आम्ही येथून उठणार नाही, अशी भूमिका घेत ठिय्या मांडला. तब्बल पाच ते सहा तास अधीक्षक अभियंता यांच्या दालनात ठिय्या मांडल्याने ( Dilip Mane Agitation ) महावितरणच्या अधिकाऱ्यांची गोची झाली होती.
सोलापुरात विद्यूत पुरवठा तोडणी मोहीम जोरात - वीज बिल थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याची मोहीम जोरात सुरू आहे. दोनच दिवसांपूर्वी पंढरपूर तालुक्यातील एका तरुण शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. विद्युत पुरवठा खंडित झाल्याने त्याने हा निर्णय घेत असल्याची माहिती व्हिडिओ तयार करून कीटकनाशक प्राशन केले. हा व्हिडिओ वायरल होताच सोलापूर जिल्ह्यात महावितरण विरोधात संतापाची लाट उसळली आहे.
अचानकपणे माजी आमदारांनी ठिय्या मारल्याने अधिकाऱ्यांची धावपळ - एखादा मोर्चा किंवा धरणे आंदोलन करायचे असल्यास पोलीस परवानगी आवश्यक असते. पण, माजी आमदार दिलीप माने यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी महावितरणच्या सोलापुरातील मुख्य कार्यालयात ठिय्या मांडल्याने धावपळ उडाली होती. कोणताही वाद न घालता, खंडित केलेला विद्युत पुरवठा सुरू करावा, अशी मागणी केली. महावितरण अभियंता संतोष सांगळे यांनी आश्वासन देत आंदोलकांना शांत केले.
दिवसभर अधीक्षक कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्या - सोमवारी सकाळी दिवसभर शेतकऱ्यांनी महावितरण अधीक्षक अभियंता संतोष सांगळे यांच्या कार्यालयात ठिय्या मांडला होता. लेखी आश्वासन मिळेपर्यंत व शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी सवलत मिळत नाही तोपर्यंत उठणार नसल्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती. अधीक्षक अभियंता यांच्या कार्यालयात शेतकरी बसल्याने त्यांनी दुसऱ्या कार्यालयात जाऊन कामकाज केले.
हेही वाचा - लॅबमध्ये घुसून महिलेस नातेवाईकांकडून मारहाण; घटना सीसीटीव्हीत कैद, गुन्हा दाखल