सोलापूर - सकल मराठा समाजाने उद्या 21 सप्टेंबरला सोमवारी सोलापूर बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सोलापूर शहर पोलीस आयुक्त यांनी सकल मराठा समाजाच्या नेत्यांसोबत रविवारी दुपारी 12 च्या सुमारास पोलीस आयुक्त कार्यालयात बैठक घेतली. यावेळी मराठा आरक्षण मुद्द्यावर चर्चा झाली. 'आसूड ओढो' आंदोलन कधी व कोणत्या प्रकारे होणार या विषयी चर्चा झाली. पोलीस आयुक्तांसोबत बैठकी अगोदर सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मिलिंद शंभरकर यासोबत देखील बैठक घेत, कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याबाबत आश्वासन दिले.
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिलेल्या माहिती अशी, की सोलापूर शहर शांत राहण्यासाठी किंवा बंदोबस्त म्हणून एक एसआरपी कंपनी दाखल झाली असल्याची माहिती दिली. सायबर सेल पोलीस सोशल मीडियावर लक्ष ठेवून आहेत. सोशल मीडियावरून कोणतीही आक्षेपार्ह पोस्ट पसरवू नये यासाठी विशेष काळजी घेणार असल्याची माहिती दिली.
सकल मराठा समाजाचे नेते माऊली पवार यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले, की मराठा आरक्षणासाठी युवक, महिला व तरुणी या आंदोलनात सहभागी होणार आहेत. कोरोना विषाणू संसर्गजन्य आजारामुळे अधिक गर्दी होणार नाही व सामाजिक अंतर पाळून हे आसूड ओढो आंदोलन होणार असल्याची माहिती दिली.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण एक वर्षासाठी स्थगित केले आहे. त्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याबरोबर राज्यभरत वेगवेगळ्या मार्गाने मराठा समाजाची आंदोलने होत आहेत. सोमवारी 21 सप्टेंबरला सोलापूर बंदची हाक दिल्याने सोलापूर शहरासह जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. या पार्श्वभूमीवर एसटी सेवा देखील एका दिवसासाठी बंद करण्यात आली आहे.