सोलापूर - एखादी लढाई लढत असताना त्याला नेतृत्व द्यावे लागते, योग्य समन्वयातून लोकहिताचे निर्णय करावे लागतात. पण राज्यातले नेतृत्व कोविडच्या लढाईमध्ये समन्वय घडवण्यात अपयशी ठरले आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केली. ते सोलापुरात बोलत होते.
सोलापूर शहरातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येची नेमकी माहिती घेण्यासाठी अन् प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर आले होते. आज त्यांनी शासकीय रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ठाकरे सरकारवर फडणवीस बरसले. कोविडच्या लढाईत मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ आणि प्रशासन यांच्यात समनव्य नसल्याची टीका केली.
प्रत्येक व्यक्ती स्वतःचा प्रोटोकॉल तयार करत आहे. मंत्रिमंडळाच्या बाहेरील व्यक्तींना या लढाईपासून दूर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे योग्य मार्गदर्शन करणारे कुणी नाही. तसेच हा समन्वय राजकीय नेतृत्वाने घडवून आणावा, अशी मागणीही फडणवीस यांनी यावेळी केली.