सोलापूर - सोलापूर महानगरपालिकेचे विद्यमान उपमहापौर राजेश काळे यांच्यावर तडीपारची ( Deputy Mayor Rajesh Kale Deported ) कारवाई करण्यात आली आहे. दोन वर्षाकरीता सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातून राजेश काळे तडीपार ( Rajesh Kale Deported for 2 years ) करण्यात आले आहे. विद्यमान उपमहापौर यांना तडीपार केल्याने सोलापूर शहरात एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे सोलापूर शहर भाजपामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
महानगरपालिका उपायुक्त यांना शिवीगाळ केली होती -
उपमहापौर राजेश काळे यांच्यावर सोलापूर शहर पोलीसात चार ते पाच गुन्हे दाखल आहेत. सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांच्यासोबत वाद घालून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल आहे. महावितरणच्या कार्यालयात जाऊन कर्मचार्यांसोबत वाद घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत जागेच्या कारणावरून वाद घातल्याप्रकरणाचा तसेच एका महिलेसंदर्भातील गुन्हाही उपमहापौर राजेश काळे यांच्यावर दाखल असल्याचे सांगण्यात आले आहे. विविध गुन्ह्यांच्या अनुषंगाने उपमहापौर काळे यांना तडीपार का करण्यात येऊ नये यासंदर्भातील नोटीस सोलापूर शहर पोलिसांकडून बजावण्यात आली होती.
सोलापूर आणि उस्मानाबाद येथून तडीपार-
बुधवारी सकाळी वरिष्ठ पोलीस अधिकार्यांच्या आदेशानुसार विजापूर नाका पोलिसांनी उपमहापौर राजेश काळे यांना ताब्यात घेऊन तडीपार करण्यासाठी सोलापूर शहराच्या बाहेर नेले आहे. सोलापूर शहर आणि जिल्हा, उस्मानाबाद जिल्हा तसेच इंदापूर तालुक्यातून तडीपार करण्यात आले आहे. उपमहापौर राजेश काळे यांच्यावर करण्यात आलेली तडीपारची कारवाई दोन वर्षाकरिता आहे. याबाबत माहिती पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी दिली आहे.
राष्ट्रवादीच्या नगरसेवक पुत्राला देखील दोन वर्षकरीता तडीपार-
सेटलमेंट भागातील रहिवासी चेतन नागेश गायकवाड यांनाही दोन वर्षासाठी सोलापूर, उस्मानाबाद, इंदापूर येथून तडीपार करण्यात आले आहे. त्यांच्यावर खून, खुनाचे प्रयत्न असे दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. चेतन गायकवाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नागेश गायकवाड यांचे पुत्र आहेत. तर उपमहापौर राजेश काळे भारतीय जनता पार्टीचे निलंबित कार्यकर्ते आहेत.