सोलापूर - रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यासाठी आलेल्या माकपच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी केला आहे. माकपच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी आडम मास्तर यांनी केली आहे.
9 ऑगस्ट रविवारी क्रांतिदिनानिमित्त मोदी सरकारच्या जनता विरोधी आणि कामगार कायद्यातील प्रतिगामी बदलाच्या विरोधात देशव्यापी भारत बचाव आंदोलनाची हाक देण्यात आली होती. त्या अनुषंगाने सोलापूरात अत्यंत शांततेत आंदोलन करण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी बळाचा वापर करून कामगारांवर व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार केल्याचा आरोप माकपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांनी केला आहे.
पोलिसांनी केलेल्या लाठीमार प्रकरणी राज्यपाल, मुख्यमंत्री, राष्ट्रीय नेते खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक व संबंधित अधिकारी यांच्याकडे सदर बाबींचे निःपक्षपाती चौकशी करून योग्य कारवाईची मागणी ज्येष्ठ कामगार नेते नरसय्या आडम मास्तर व सिटू चे राज्य महासचिव अँड एम. एच.शेख यांनी केली.अखिल भारतीय कामगार संघटना, किसान व शेतमजूर संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या अवाहनानुसार दि ९ ऑगस्ट क्रांती दिनी सोलापूर येथील श्रमिक कष्टकर्यांनी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन या कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शारीरिक अंतर ठेवून, मास्क व सॅनिटायझरचा वापर करून आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यासाठी जमणार होते. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलनकर्त्यावर लाठीमार करून त्यांना पांगविण्याचा प्रयत्न केला.
या लाठीमाराचा निषेध करत या प्रकरणाची सखोल चौकशी करून लाठीमार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी नरसय्या आडम मास्तर यांनी केली आहे.