सोलापूर - महानगरपालिके अंतर्गत कोविड केअर कंट्रोल रुमचे कामकाज चालते. त्या माध्यमातून खासगी दवाखान्यावर नियंत्रण केले जात आहे. कोविड उपचारात अधिक बिले आकारणी करणाऱ्या रुग्णालयावर देखील नियंत्रण केले जात आहे. असाच एक दणका सोलापूर महानगरपालिकेने खासगी रुग्णालय नर्मदा हॉस्पिटलला दिला आहे. कोविड उपचारासाठी रुग्णास ज्यादा बिले आकारली होती. ही बिले सरकारच्या निदर्शनास आल्यावर ज्यादा आकारणी केली असल्याची माहिती समोर आली होती. त्यावर कोविड कंट्रोल विभागाने ज्यादा आकारलेली रक्कम रुग्णास परत देण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने 43 रुग्णांना त्यांची रक्कम परत मिळाली आहे.
नर्मदा हॉस्पिटलमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या बिलांचे लेखापरीक्षण करण्यात आले. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी उपायुक्त धनराज पांडे यांच्या माध्यमातून सर्फराज मोमीन, अश्विन झिन्जुरे व विष्णू गाडे यांची लेखापरीक्षक म्हणून नियुक्त केली. त्यांनी 43 रुग्णांचे पाच लाखांचे अतिरिक्त बिल परत मिळवून दिले आहे.
सोलापूर महानगरपालिकेने केलेल्या लेखापरीक्षणात 43 रुग्णांना खासगी रुग्णालयांनी आकारलेल्या बिलांत तफावत आढळून आली होती. ज्यादा रक्कम आकारलेल्या रुग्णास ती परत करण्याकरता आयुक्त पी. शिवशंकर यांनी संबंधित रुग्णालयांना नोटीस बजावली होती. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या ज्यादा बिलाची रक्कम तत्काळ परत द्यावी, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार नर्मदा हॉस्पिटलने 43 रुग्णांचे धनादेश व त्यांची यादी महापालिकेला सादर केली. त्यानुसार महापौर श्रीकांचना यन्नम, उपायुक्त धनराज पांडे यांच्या हस्ते संबंधित रुग्णांना धनादेश वितरीत करण्यात आले.
कोविड उपचारात ज्यादा बिले घेणाऱ्यांवर होणार कारवाई
कोरोनाच्या महामारी काळात कोणत्याही हॉस्पिटलने रुग्णांकडून ज्यादा बिल घेऊ नये. रुग्णांनी तक्रार केल्यास संबंधित रुग्णालयांकडून ती रक्कम वसूल केली जाईल. तसेच त्या रुग्णालयांवर ठोस कारवाई केली जाईल, असा इशारा महापौर श्रीकांचना यन्नम यांनी धनादेश वाटपाच्या कार्यक्रमात बोलताना दिला. ज्यादा बिल घेतल्यास संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांनी कोविड कंट्रोल रूमला अर्ज करावा, असे आवाहन उपायुक्त धनराज पांडे यांनी केले आहे. यावेळी चंद्रकांत मुळे, उज्वला गणेश, सिद्धाराम मेंडगुदले, विनायक मोटे, समीर शेख आदी उपस्थित होते.