सोलापूर - सोलापुरात काँग्रेस आणि युवक काँग्रेस महागाई विरोधात आक्रमक झाली आहे. शहरातील विविध ठिकाणी काँग्रेसकडून आंदोलन केले जात आहे. काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते चौका चौकात केंद्र सरकार विरोधात पोस्टर हातात घेऊन निषेधाच्या घोषणा देत आहेत. पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलेंडरचे दर इतके वाढले आहेत की सर्वसामान्य नागरिकांना ते परडवण्यासारखे नाहीत. महागाईने सर्व सामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. वाढलेल्या महागाईचा सर्वत्र विरोध केला जात आहे. इंधन दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीही वाढत आहेत. यामुळे शहरातील विविध ठिकाणी आंदोलन ( Congress Protests Against BJP ) करत असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश वाले यांनी दिली.
एकाच वेळी दोन ठिकाणी काँग्रेसची महागाई विरोधात निदर्शने - युवक काँग्रेस आणि काँग्रेसच्या वतीने सोलापूर शहरातील विजापूर रोड आणि शिवाजी चौक येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी मोदी सरकार आणि केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. नुकत्याच चार राज्यांच्या निवडणुका झाल्यापासून इंधनाची दरवाढ होतच चालली आहे. मागील आठ दिवसांत पेट्रोलच्या किंमती दररोज वाढल्या आहेत. घरगुती वापरातील गॅस सिलेंडरच्या किंमतीही वाढल्याने गृहिणींचे आर्थिक गणित कोलमडले आहे. या सर्व बाबींचा निषेध करण्यासाठी काँग्रेस मागील एक आठवड्यापासून आक्रमक झाली असून चौका चौकात आंदोलन करत आहे.
पोलिसांचा चोख बंदोबस्त - सोलापूर-विजापूर महार्गावर असलेल्या इंचगिरी मठाजवळ आणि बसस्थानक परिसरात असलेल्या शिवाजी चौकात काँग्रेसच्या आंदोलनामुळे पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता. या आंदोलनामुळे वाहतूक व्यवस्थेवर कोणतेही दुष्परिणाम होऊ नये, याची विशेष काळजी पोलिसांनी घेतली होती.