सोलापूर - पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. सुमित भोसले या काँग्रेस कार्यकर्त्याने शहरातील मध्यवर्ती भागात घोड्यावर स्वार होऊन इंधन दरवाढीचा विरोध करत अनोखे आंदोलन केले.
शहरात विविध ठिकाणी पेट्रोल दरवाढीचा विरोध करून आंदोलन
नगरसेवक विनोद भोसले व प्रभाग क्र. 15 च्या वतीने नवल पेट्रोल पंप येथे केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तसेच नगरसेविका वैष्णवी करगुळे यांच्या नेतृत्वाखाली प्रतिकात्मक रित्या दुचाकी वाहन भंगारमध्ये विक्रीला काढून पेट्रोल आणि गॅसदरवाढीचा विरोध केला.
कच्च्या तेलाच्या किमती कमी होऊनही पेट्रोल दरवाढ
यावेळी काँग्रेसच्या विविध पदाधिकारी म्हणाले, गेल्या 7 वर्षांपासून पेट्रोल, डिझेल व गॅसची दरवाढ ही केंद्र सरकार सातत्याने करत असून याचा फटका सर्व सामान्य नागरिकांना बसत आहे. सुमारे 25 लाख कोटी रुपये केंद्र सरकारने या दरवाढीतून गोळा केले आहेत. परिणामी महागाई वाढली आहे. विशेषतः आंतराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव कमी असतानाही सातत्याने भाववाढ करून नागरिकांवर महागाई लादली जात आहे. इंधन दरवाढी केंद्राने तत्काळ मागे घ्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
पोलिसांनी कार्यकर्त्यांसह घोड्यालाही घेतले ताब्यात
सोलापूर विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनात परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, रुपेश गायकवाड, कुणाल घोडके, शाहू सलगर, बसवराज कोळी, सुभाष वाघमारे, इम्रान गढवाल, सिद्धू कोरे, बलभीम चव्हाण, जलील शेख, नितीन जमदाडे, रोहित भोसले आदी कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच फौजदार चावडी पोलिसांनी घोड्यावर आंदोलन करणारे सुमित भोसले यांनाही अटक करून गुन्हा दाखल केला व घोडाही ताब्यात घेतला.
हेही वाचा - सोलापूर होमगार्ड प्रशिक्षण केंद्राला नवसंजीवनी; अधीक्षक झेंडेंच्या पाठपुराव्याला यश