सोलापूर - सोलापूर शहरात घरगुती गॅसचा सुरू असलेला लाखोंचा काळाबाजार गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे. घरगुती वापरातील गॅस सिलेंडरचा उपयोग रिक्षामध्ये किंवा इतर वाहनात भरत असताना ही कारवाई केली आहे. यामध्ये एकूण 8 संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून, 8 लाख 48 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
घरगुती वापरातील गॅस सिलेंडर काळ्याबाजारात विकणाऱ्या प्रमुख व मोठया माशांवर कारवाई होणार की नाही? हा देखील प्रश्न अनेकांना पडला आहे. कारण ऐन दिवाळीत घरगुती वापरातील गॅस सिलेंडर काळ्या बाजारात विकल्याने सोलापुरात गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे सोलापुरात जीवनावश्यक वस्तूंचा मोठा काळाबाजार सुरू आहे.
पोलीस प्रशासनाची जीवनावश्यक वस्तूंच्या काळ्याबाजारावर नजर-
शहरामध्ये अवैध धंद्यावर प्रभावी कारवाई करून त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबत पोलीस आयुक्त हरीष बैजल व पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/विशा) बापू बांगर यांनी गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना आदेश दिले होते. त्याअनुषंगाने शहर पोलीस आणि गुन्हे शाखेने सोलापुरात अवैध धंदेवाल्यांवर बारीक नजर ठेवली आहे. सोलापुरात जीवनावश्यक वस्तूंचा देखील मोठा काळाबाजार होतो, त्यामध्ये रेशनचा गहू, तांदूळ, पेट्रोल, घरगुती वापरातील गॅस सिलेंडर आदी वस्तू भेळमिसळ करत काळ्या बाजारत मोठ्या दराने विक्री केल्या जातात. पण जीवनावश्यक वस्तूंच्या काळ्या बाजारातील उलाढाल रोखण्याचे काम महसूल खात्याचे आहे. महसूल खात्यातील जिल्हा पुरवठा अधिकारी कधीच याकडे डोकावून बघत नाहीत. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची काळ्या बाजारत मोठी उलाढाल सुरू आहे.
हेही वाचा - पतीकडून पत्नीचा व्हॉट्सअपवर आक्षेपार्ह स्टेट्स ; पोलिसात तक्रार केल्यानंतर तोंडावर फेकले अॅसिड
शहरात गॅस सिलेंडरचा लाखोंचा काळा बाजार सुरू होता-
गुन्हे शाखेतील पोलीस उप निरीक्षक संदीप शिंदे व त्यांच्या पथकातील पोलीस कर्मचारी 9 नोव्हेंबर रोजी पोलीस आयुक्तालय हद्दीत अवैद्य धंद्यावर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते. यावेळी गोपनीय व खात्रीशीर बातमी मिळाली की, सोलापूर शहरातील प्रभाकर महाराज मठाजवळ जवळकर वस्ती, सार्वजनीक शौच्यालयाच्या बाजूस असलेल्या पत्र्याच्या खोलीमध्ये अवैधरित्या घरगुती वापरातील गॅस टाक्यांचा साठा करून ते गॅस सिलेंडर गॅस टाक्यामधून अवैधरित्या रिक्षा व इतर वाहनामध्ये भरत आहेत.
साडे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त -
गुन्हे शाखेच्या पथकाने माहिती मिळाल्याबरोबर ताबडतोब सदर ठिकाणी छापा टाकला. यात संगरत्न निजलिंगआप्पा इंगळे (रा. बुधवार पेठ मिलींद नगर, जी एम चौक जवळ सोलापूर), महेश बाबासाहेब कांबळे (रा.प्रभाकर महाराज मठा शेजारी सोलापूर) यांच्यासह इतर 6 असे एकूण आठ संशयित आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एकूण 17 गॅस टाक्या, 7 रिक्षा, 2 इलेक्ट्रीक वजन काटे, रिक्षात गॅस भरण्यासाठी वापरलेली इलेक्ट्रीक मोटार व इतर साहीत्य असे एकूण 8 लाख 41 हजार 250 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. .
ही कारवाई गुन्हे शाखेच्या या पथकाने केली-
सदरची कामगिरी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय संदीप शिंदे, अजय देवराम पाडवी, तात्या पाटील, अजिंक्य माने, कुमार शेळके गणेश शिंदे, राजकुमार पवार व निलोफर तांबोळी संजय काकडे, ढेकणे यांनी पार पाडली.
हेही वाचा - सचिन वाझेचा ताबा ईडीला द्यायला न्यायालयाचा नकार