सोलापूर- सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी देगाव रोड परिसरातील जुनी लक्ष्मी चाळीत समोर आला आहे. अनिल नागनाथ चांगभले ( वय 50 ) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी सिव्हील पोलीस चौकीत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यापूर्वी १२ जुलैला सावकारी जाचाला कंटाळूनच अमोल जगताप या हॉटेल व्यावसायिकाने मुले आणि पत्नीसह आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली होती. त्यानंतर आता एका रिक्षा चालकाचा या खासगी सावकारीच्या जाचाने जीव गेला आहे.
शहरातील जुनी लक्ष्मी चाळ परिसरात बालवीर वाचनालय आहे. या वाचनालयात अनिल चांगभले हे शिपाई या पदावर काम करत होते. दरम्यान ते मधल्या वेळेत रिक्षाचालक म्हणूनही काम करत असत. बुधवारी दुपारी रिक्षा घेऊन ते रिक्षा व्यवसायाकरिता घरातून बाहेर पडले. त्यांनी आपली रिक्षा वाचनालयाच्या समोरील रस्त्यावर उभी केली होती. त्यानंतर त्यांनी वाचनालय उघडले आणि वाचनालयातच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.
साधारण पाच वाजण्याच्या सुमारास त्यांचा मुलगा कामानिमित्त त्या रस्त्याने जात होता. त्यावेळी वाचानालयाजवळ त्याला त्याच्या वडिलांची रिक्षा रस्त्यावर उभी असल्याचे दिसून आले. त्याने आजूबाजूला पाहणी केली, परंतु वडील कुठेच दिसून आले नाहीत. त्यानंतर त्याने वाचनालयाचे दार ढकलून आत पाहिले असता, त्याच्या वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. मुलाने इतर नातेवाईक व मित्रांच्या मदतीने अनिल यांना शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी सिव्हिल पोलीस चौकीत नोंद झाली करण्यात आली आहे. तसेच सलगरवस्ती पोलीस ठाण्यातही या घटनेची माहिती देण्यात आली आहे.
चिठ्ठीत सावकांरांची नावे असल्याची चर्चा-
अनिल चांगभलं यांना सावकाराकडून पैशाच्या कारणावरून नेहमी तगादा होता. लॉकडाऊनमुळे त्यांच्या अडचणीत भर पडली होती. परंतु सावकाराकडून पैशासाठी होणारा त्रास मात्र थांबला नव्हता. दरम्यान बुधवारी त्यांच्या कपड्यात सापडलेल्या चिठ्ठीमध्ये सावकारांची नावे असल्याची चर्चा आहे. याबाबत सलगर वस्ती पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता.