सोलापूर - सोलापूर महानगरपालिकेच्या ऑनलाइन सभेत शहरातील आठ प्रभागात जम्बो कोविड सेंटर सुरू करा, अशी आग्रही मागणी करण्यात आली. तसेच कम्युनिटी किचन सुरू करा, अशीही मागणी या ऑनलाइन सभेत नगरसेवकांकडून करण्यात आली. मात्र, आचारसंहिता असल्याने जम्बो कोविड रुग्णालयाचा विषय सभेत होऊ शकत नाही, असे प्रशासनाच्या वतीने सांगितले. महापौर श्रीकांचना यन्नम यांनीही हाच विषय लावून धरला होता. कोरोनामुळे अनेक लोकांवर मृत्यूचे संकट आले आहे, अशा संकटात कसली आचारसंहिता म्हणून सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले होते.
कोरोनामुळे सोलापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा ऑनलाइन आणि ऑफलाइन
कोरोनामुळे सर्व शासकीय व खासगी कामकाजावर अनेक निर्बंध आले आहे. वाढत्या कोरोना महामारीमुळे एप्रिल महिन्याची सोलापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा ऑनलाइन झाली. विरोधी नेते कोरोनाच्या विविध प्रश्नांवर आक्रमक होत प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी तातडीने दुखवटा सादर करून ऑनलाइन सभा रद्द केली. ऑनलाइन सभेत प्रश्नांवर उत्तरे न मिळाल्याने विरोधी पक्षनेते, गटनेते आदींनी महापौर दालनात जाऊन ऑफलाइन बैठक घेतली.
शहराबाहेर असलेल्या सिद्धेश्वर कारखान्याजवळ कोविड सेंटर सुरू करण्यासाठी हालचाली
कोरोना महामारीत आचारसंहिता असल्याने जम्बो कोविड रुग्णालय सुरू करता येऊ शकत नाही, असे उत्तर देताच अमोल शिंदे, चेतन नरोटे, आनंद चंदनशिवे आदींनी संतप्त होत प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावर महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी ऑनलाइन उत्तर दिले. सिद्धेश्वर कारखान्या जवळील एका मंगल कार्यालयात जम्बो कोविड सेंटर सुरू करणार आहे. त्याची पाहणी सुरू आहे, असे उत्तर देऊन लोकप्रतिनिधींना शांत केले.
हेही वाचा - रेमडेसिवीरमुळे कोरोना मरत नाही - अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर