सोलापूर - महानगरपालिका निवडणुकांसमोर बंडखोरी किंवा या एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्याची संख्या वाढली आहे. एमआयएम पक्षाला मोठा धक्का देत सहा नगरसेवकांनी राष्ट्रवादीसोबत घरोबा केला आहे. यावर बोलताना एमआयएम पक्षाचे विद्यमान शहर व जिल्हा प्रमुख फारूक शाब्दी म्हणाले, त्यांचा अधिकृत प्रवेश झाला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यात एमआयएमच्या ज्या नगरसेवकांनी हजेरी लावली होती, त्यांच्यावर कारवाई निश्चितच होणार आहे. त्याबाबत पक्षाच्या वरिष्ठांना अहवाल पाठविण्यात आल्याचे शाब्दी यांनी सांगितले.
एमआयएमचे पाच नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेससोबत
सोलापूर शहरात 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत एमआयएम पक्षाने मोठी मुसंडी मारत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना कडवी टक्कर दिली होती. त्यांनतर 2017 साली सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत एमआयएम पक्षाच्या आठ नगरसेवकांनी विजय प्राप्त करून आपले अस्तित्व निर्माण केले आहे. पण, माजी शहराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक तौफिक शेख व विद्यमान शहर व जिल्हा प्रमुख फारूक शाब्दी यांच्यातील राजकीय वर्चस्वाच्या लढाईत सोलापुरातील एमआयएम पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. सुमारे सहा नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाणार आहेत. यामुळे फेब्रुवारी, 2022 मध्ये होणाऱ्या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत एमआयएम पक्ष सोलापुरात आपले अस्तित्व टिकवणार का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
शाब्दी म्हणतात 'ते' अजून अधिकृतरित्या राष्ट्रवादी पक्षात गेले नाहीत
तौफिक शेख, तस्लिम शेख, नूतन गायकवाड, पूनम बनसोडे, वाहिदा युनूस शेख, शहजादीबानो शेख हे सहा नगरसेवक तौफिक शेख यांच्या गटातील आहेत. तौफिक शेख यांच्यामुळे त्यांच्या गटातील नगरसेवकही राष्ट्रवादीच्या प्रवेशाच्या वाटेवर आहेत. शुक्रवारी (दि. 8 ऑक्टोबर) रोजी सोलापुरात शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात एमआयएम नगरसेवक तौफिक शेख यांनी मंचावरून भाषण केले आणि येणाऱ्या सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता आणू, असा विश्वास व्यक्त केला. तरीही शाब्दी म्हणाले की, त्यांनी अद्याप अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला नाही. पण, त्यांच्याबाबत पक्षश्रेष्टींना सर्व माहिती आहे.
एमआयएम पक्षात घराणेशाही
एमआयएम पक्षाचे शहर व जिल्हा प्रमुख फारूक शाब्दी यांनी अक्कलकोट तालुक्यात राहणारे त्यांचे बंधू मुस्तफा शाब्दी यांना सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मुस्लिम बहुलअसलेल्या शहरातील प्रभाग क्र. 14 मधून मुस्तफा शाब्दी यांना उमेदवारी दिली जाणार असल्याने प्रभाग 14 मधील स्थानिक नेते नाराजी व्यक्त करत आहेत. तसेच राष्ट्रवादीसोबत जवळीक साधणारे एमआयएमचे विद्यमान नगरसेवक तौफिक शेख यांच्या विरोधातही प्रभाग 21 मध्ये मजबूत उमेदवार एमआयएमकडे नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणाऱ्यांचा अहवाल पाठवला आहे, बंडखोरांवर लवकरच कारवाई
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात उपस्थित असणाऱ्या एमआयएम नगरसेवकांचा अहवाल आम्ही पक्षांच्या वरिष्ठांना पाठवला आहे. लवकरच त्या नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई केली जाणार असल्याची माहितीही फारूक शाब्दी यांनी दिली.
हेही वाचा - आयकर विभागाची कारवाई सूडबुद्धीने, राष्ट्रवादीकडून केंद्र सरकारचा निषेध