सोलापूर - नियम बाह्य काम करण्यासाठी भाजपाचे उपमहापौर राजेश काळे यांनी पालिका आयुक्त पी. शिवशंकर, उपायुक्त धनराज पांडे आणि विभागीय अधिकारी नीलकंठ मठपती यांना अर्वाच्य भाषा वापरत शिवीगाळ केली तसेच उपायुक्त धनराज पांडे यांना पाच लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात उपमहापौर राजेश काळेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपमहापौर काळे हे गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहेत.
ऑडिओ रिकॉर्डिंग व्हायरल
या ऑडिओ रिकॉर्डिंगमध्ये खालच्या पातळीच्या भाषेत उपमहापौर राजेश काळे हे शिवीगाळ करत असल्याचा ऑडिओ वायरल झाला आहे. राजेश काळे हे सामूहिक लग्नविवाह सोहळ्यासाठी महापालिकेचे फिरते शौचालय का पाठविले नाही म्हणून चिडून मनपा उपायुक्त धनराज पांडे यांना शिवीगाळ करत आहेत. ऑडिओ सोशल मीडियावरून सगळीकडे व्हायरल झाल्याने एकच चर्चा ऐकावयास मिळाली.
काळ्या फिती लावून कामकाज
उपमहापौर राजेश काळे यांच्या विरोधात निषेध व्यक्त करत सोलापूर महानगरपालिकेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले. सभागृहासमोर एकत्रित जमून उपमहापौर राजेश काळेंविरोधात निदर्शनेदेखील केली.
या आंदोलनात भाजपा नगरसेवकांचादेखील सहभाग
राजेश काळे हे भाजपाचे उपमहापौर आहेत. त्यांच्या वारंवारच्या वादग्रस्त प्रकरणावरून पक्ष श्रेष्ठींकडे तक्रार केली जाणार आहे. तसेच त्यांचे नगरसेवक पददेखील रद्द करा, अशी मागणी करणार आहे, असे नगरसेवक व भाजपा गटनेते सुरेश पाटील यांनी सांगितले.
गुन्हा दाखल झाल्यापासून उपमहापौर फरार
उपमहापौर राजेश काळे यांविरोधात सदर बझार पोलीस ठाण्यात भा. दं. वि. 353, 385,504, 505 आणि 294नुसार गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून ते फरार झाले आहेत. याबाबत पोलीस निरीक्षक संजय पाटील अधिक शोध घेत आहेत.