सोलापूर - सोलापूर महानगरपालिकेचा कार्यकाळ संपल्यामुळे तेथे प्रशासक नेमण्यात आला आहे. प्रशासकपदी पालिका आयुक्त पी. शिवशंकर ( Solapur Municipal Commissioner P Shivshankar) यांची नेमणूक 8 मार्च रोजी झाली होती. 8 मार्च ते आजपर्यंत (29 एप्रिल) पालिकेने 76 प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. प्रशासक नेमल्यापासून पालिकेची कामे ही जलद गतीने सुरु आहेत. अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.
पालिकेच्या कामासाठी त्रिस्तरीय समिती - सोलापूर नगरपालिका 1 ऑगस्ट 1852 रोजी स्थापन झाली होती. सोलापूर नगरपालिकेचे 1 मे 1964 रोजी महानगरपालिकेत रूपांतर झाले. नगरपालिकेचे शेवटचे नगराध्यक्ष पारसमल जोशी हेच पहिल्या सोलापूर महानगरपालिकेचे महापौर झाले होते. यंदा मार्च 2022 रोजी भाजपच्या महापौर श्रीकांचना यंनम यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. 8 मार्च 2022 पासून सोलापूर महानगरपालिकेवर प्रशासक म्हणून आयुक्त पी. शिवशंकर यांची नेमणूक करण्यात आली. मार्च 2022 मध्ये सोलापूर महानगरपालिकेचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने प्रशासकपदी आयुक्तांनी चार्ज घेतला. त्यांच्या मदतीसाठी तीन सदस्यीय समिती काम करत आहे. यामध्ये अतिरिक्त आयुक्त, नगरसचिव, मुख्य लेखापाल हे अधिकारी आयुक्तांना सोलापूरच्या विकास कामात मदत करत आहेत.
आयुक्तांनी दिली 76 प्रस्तावांना मंजुरी; एकही प्रस्ताव प्रलंबित नाही - महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर सोलापूर शहरातील विकास कामांना प्राधान्य देत विविध विषयांवर पेंडिंग असलेल्या 76 विकास प्रस्ताव कामांना मंजुरी देण्याचे काम अंतिम टप्प्यात आणले आहे. पालिका सभागृहात पेंडिंग असलेल्या सर्व विषय प्रस्तावांना मंजुरी मिळाली असल्याची माहिती जनमाहिती अधिकारी यांनी दिली. सद्यस्थितीत सोलापूर महानगरपालिकेचा कारभार आयुक्तांकडे असल्याने 76 प्रस्तावांना मंजुरी देताना कोणत्याही प्रकारचा विरोध झाला नाही. महानगरपालिकेचा कार्यकाळ अस्तित्वात असला असता तर या 76 विषयांना पालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर आणून चर्चा करून, दुरुस्ती करून मंजुरी घ्यावी लागली असती. पण एकहाती सत्ता असल्याने सर्व 76 प्रस्ताव आयुक्तांच्या सहीने मंजूर झाले आहेत.
महानगरपालिकेचा कार्यकाळ अस्तित्वात असताना असे चालायचे काम - महाराष्ट्र राज्यातील 5 महानगरपालिकांवर प्रशासक नेमला आहे. सोलापूर महानगरपालिकेचा देखील कार्यकाळ संपल्याने भारतीय प्रशासकीय सेवेतील पी. शीवशंकर यांनी चार्ज घेतला आहे. सोलापूर महानगरपालिकेत यापूर्वी 102 नगरसेवक, महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेता, गट नेता, स्थायी समिती सभापती, विषय समिती सभापती आदीच्या माध्यमातून लोकशाही पद्धतीने महानगरपालिकेचा कामकाज चालत होता. दरमहा सर्वसाधारण सभेत अनेक विषय, प्रस्ताव सभापटलावर यायचे. यावर वादळी चर्चा होत होती. यामध्ये विस्कळीत पाणी पुरवठा, घंटागाडी, घनकचरा व्यवस्थापन इत्यादी विषयावर प्रस्ताव सभेत येत होते. सर्व नगरसेवकांच्या सर्वसंमतीने , किंवा फेरदुरुस्तीने पुन्हा प्रस्ताव मांडले जात होते.पण 8 मार्च पासून सोलापूर महानगरपालिकेचा कार्यकाळ संपला असून महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्या हाती गेला आहे. कोणत्याही प्रस्तावाला आता कोण विरोध करणाराच राहिला नाही. त्यामुळे सर्वच्या सर्व विषयांना प्रशासकाकडून मजुरी मिळत आहे.
हेही वाचा - Video : मध्यप्रदेशात लग्नानंतर वडिलांनी मुलीची केली हेलिकॉप्टरमधून पाठवणी..