सोलापूर - राज्य शासनाच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यातील 1 हजार 980 शाळा सुरू झाल्या असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली आहे. त्याचबरोबर, शहर आणि जिल्ह्यातील खासगी शाळांनी विद्यार्थ्यांना किंवा पालकांना फीसाठी तगादा लावून त्रास दिला किंवा त्यांचे शिक्षण थांबविल्यास मोठी कारवाई करणार असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांनी दिली.
हेही वाचा - दीड वर्षानंतर सोलापुरातील शाळांमध्ये 'किलबिलाट' सुरू.. वर्गमित्रांसमवेत विद्यार्थ्यांचा आनंदोत्सव
सोलापूर जिल्ह्यातील 1980 शाळा सुरू
सोलापूर जिल्ह्यात एकूण 11 तालुके आहेत. या अकरा तालुक्यांतील विविध गावांतील 1 हजार 980 शाळा सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद सीईओ दिलीप स्वामी यांनी दिली. करमाळा, पंढरपूर, माळशिरस या तालुक्यांत आजही कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे, त्यामुळे रुग्णसंख्या वाढत असलेल्या गावात शाळा बंदच आहेत. सोलापूर शहर महानगरपालिका अंतर्गत सरकारी आणि खासगी सर्व शाळा सुरू झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये 5 वी ते 12 वी पर्यंतचे सर्व वर्ग सुरू करण्यात आले आहेत.
शाळेत हेल्थ क्लिनिक सुरू
विद्यार्थी शाळेत किंवा वर्गात दाखल होत असताना त्याने मास्क परिधान केले आहे की नाही, हे पाहणे अनिवार्य केले आहे. जर त्याकडे मास्क नसेल, तर शालेय प्रशासनाने त्याला मास्क उपलब्ध करून देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच, प्रत्येक शाळेच्या शिक्षकांकडे विद्यार्थ्याचे तापमान तपासणी करण्याचे यंत्र देण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्याचे शारीरिक तापमान अधिक असेल त्याची संपूर्ण तपासणी करून त्यावर उपचार करूनच वर्गात बसण्याची परवानगी दिली जाणार आहे.
...अन्यथा खासगी शाळांवर कारवाई करणार
सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांना किंवा पालकांना फीसाठी तगादा लावू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. फीसाठी कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबविले जाणार नाही, याची जबाबदारी देण्यात आली आहे. कोरोनामुळे किंवा लॉकडाऊनमुळे अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. फीसाठी खासगी संस्था चालकांनी टप्प्याटप्प्याने फी घ्यावी, एकदम फी भरा, असा तगादा लावू नये, अन्यथा योग्य ती कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांनी दिली.
हेही वाचा - महागाई विरोधात सोलापुरात काँग्रेस पक्षाच्या वतीने निदर्शने