सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून महामार्ग गेलेले आहेत, अशा 26 हजार 529 खातेदारांना 1 हजार 835 कोटी रूपयांची भरपाई देण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गासह इतर चौपदरी रस्त्याच्या कामासाठी शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली आहे. यामध्ये 1 हजार 786 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून, या शेतकऱ्यांना मोबदला देण्यात आला असल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यातून मराठवाडा, कर्नाटक, कोकण, पुणे परिसराला जोडणारे महामार्ग जातात. भारतीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग (राष्ट्रीय महामार्ग), राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे जिल्ह्यातील महामार्गाचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. 1 हजार 226 किमीच्या रस्त्यासाठी 1 हजार 786 हेक्टर जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, 26 हजार 529 खातेदारांना 1 हजार 835 कोटी 37 लाख रूपयांच्या रकमेचे वाटप झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर, अक्कलकोट यासारखी राज्यातील महत्वाची तिर्थक्षेत्र आहेत. पंढरीच्या पाडूंरगाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पंढरपुरात येतात. तसेच आषाढी आणि कार्तिकी वारीसाठी लाखो वारकरी पायी चालत येत असतात. पंढरपूरला पायी येणाऱ्या वारकऱ्यांसाठी पालखी मार्ग देखील विकसीत करण्यात येत आहेत. सोलापूर जिल्ह्यातून सध्या 22 मोठ्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत. यामध्ये पालखी मार्गाच्या कामांचाही समावेश आहे. जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून आठ ठिकाणी चौपदरीचे तर सार्वजनिक बांधकाम पाच ठिकाणी आणि राज्य रस्ते विकास महामंडळाकडून नऊ ठिकाणी दुपदरीच्या महामार्गाचे काम सुरू आहे.
जिल्ह्यातील 275 गावातून 22 प्रकल्पांचे काम सुरू असून, 61 हजार 459 जमीन मालक बाधित झाले आहेत. यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात 56 हजार 936, सार्वजनिक बांधकाममध्ये 71 आणि राज्य रस्ते विकास महामंडळात 4 हजार 452 बाधित जमीन खातेदार आहेत. भूसंपादन झालेल्या जमिनींसाठी 3 हजार 407 कोटी 96 लाख रूपये एवढ्या रकमेची भरपाई देण्यात येणार आहे. आतापर्यंत 26 हजार 529 खातेदारांच्या बँक खात्यात 1 हजार 835 कोटी 37 लाख रूपये जमा करण्यात आले आहेत. 34 हजार 930 खातेदारांना 637 कोटी 67 लाख रूपये देण्याचे कामही सुरू झाले असल्याचे भूसंपादन अधिकारी शैलेंद्र सुर्यवंशी यांनी सांगितले आहे.