सांगली - प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना शेतकऱयांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणारी आहे. देशाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना असल्याचे मत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना किरकोळ गरजांसाठी आता सावकारांकडून कर्ज घेण्याची गरज पडणार नाही, असा विश्वासही देशमुख यांनी व्यक्त केला. सांगलीमध्ये पार पडलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा आज (रविवार) सांगलीमध्येही शुभारंभ झाला. देशातील जवळपास १२ कोटी शेतकऱ्यांना दरवर्षी ७५ हजार कोटी रूपयांची मदत देणारी देशाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक योजना आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या या योजनेबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन करून पालकमंत्री देशमुख यांनी या योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ केला.
याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी देशमुख म्हणाले, २ हजार प्रमाणे जिल्ह्यातील जवळपास २ लाख २७ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात साडे चार कोटी रुपये सरकारकडून जमा करण्यात आल्याचे सांगून ही योजना शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या संपन्न करण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत प्रति शेतकरी कुटुंबाला प्रतिवर्ष ६ हजार रूपये इतके आर्थिक सहाय्य ३ टप्प्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
१ फेब्रुवारीला योजना जाहीर करणे व २४ फेब्रुवारीला लाभार्थ्यांच्या खात्यात निधी वर्ग होणे ही देशाच्या इतिहासतील पहिलीच घटना असल्याचे मत यावेळी मंत्री देशमुख यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविल्या जाणाऱ्या या योजनेमुळे ५ एकराच्या आतील शेतकऱ्यांना ६ हजार रूपयांची प्रतिवर्ष मदत मिळणार असल्याने शेतकऱ्याला बियाणे, खते, औषधे यासारख्या गोष्टींसाठी सावकारांकडून कर्ज घेण्याची गरज पडणार नाही, असा विश्वास यावेळी देशमुख यांनी व्यक्त केला.