पुणे - आयुष्यात एकदाही भूत या नावाशी सामना न झालेली व्यक्ती सापडणे तसे कठीण आहे. कुठल्याही गावात, शहरात काही जागा भुताने पछाडलेल्या असल्याचे अनेकांचे गैरसमज असतात. त्या ठिकाणी भुतांचा वावर आहे, असा लोकांचा गैरसमज असतो. बहुतांश वेळा यामध्ये जुने वाडे, पडकी घरे, चिंचेचे झाड, वडाचे, पिंपळाचे झाड यांचा समावेश असतो. पुण्यातही काही जागा अशा आहेत, ज्यांना 'भूत बंगला' म्हणून ओळखले जाते. या बंगल्यात भुतांचे वास्तव्य असल्याचा समज आहे. त्यामुळे या बंगल्यांकडे सहजासहजी कुणी फिरकत नाही. परंतु खरंच या बंगल्यात भूतं आहेत का ? याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पुण्यातील तीन तरुणांनी..आणि समोर आलं एक धक्कादायक वास्तव...
संकल्प माळवे, गौतम देबनाथ आणि ताहा राजकोटवाला अशी या तरुणांची नावे आहेत. तिघेही खासगी कंपन्यात नोकरीला आहेत. शनिवार, रविवार या सुट्ट्यांच्या दिवशी हे तिघेही भुतांनी पछाडलेल्या जागा शोधतात आणि रात्री अपरात्री जाऊन ती जागा व्हिडीओ कॅमेऱ्यात बंदिस्त करतात. आतापर्यंत त्यांनी पुण्यातील चार भूत बंगल्यांना आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. त्यांना खरंच भूत आढळले का ? हे 'ईटीव्ही भारत'ने जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
संकल्प माळवे म्हणतो, आम्ही तिघांनी भूत या संकल्पनेवर आधारित वेबसिरीज काढण्याचे ठरवले होते. खरेच भूत आहे, की ती अंधश्रद्धा आहे हे आम्हाला लोकांना लाईव्ह दाखवायचे होते. त्यासाठी आम्ही पुणे शहरातील काही 'हंटेड प्लेस' शोधल्या आणि रात्री आणि दिवसा चित्रीकरण केले. परंतु आम्ही या भूत बंगल्यात प्रवेश करताच विदारक दृश्य दिसले. आतमध्ये आम्हाला ड्रग्स, कोकेन घेतल्याचे अवशेष, दारूच्या बाटल्याचा खच, सिगारेटचे पाकीट विखुरलेले दिसले. हे पाहून आम्ही हादरलो. हेच विदारक चित्र आम्ही लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. त्यातून या वेबसिरीजची निर्मिती झाली.
या तरुणांच्या टीममध्ये गौतम देबनाथ याच्यावर चित्रीकरणाची जबाबदारी आहे. आपल्या अनुभवविषयी सांगताना तो म्हणतो, भूत बंगला अशी ओळख असणाऱ्या चार ठिकाणी मी आतापर्यंत चित्रीकरण केले. परंतु भूत अद्यापतरी मला दिसले नाही. परंतु भुतांच्या नावाखाली सुरू असलेल्या अनेक वाईट गोष्टी उघडकीस आल्या. त्यामुळे भुतांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या बंगल्यात भलत्याच गोष्टी सुरू असल्याचे आमच्या निदर्शनास आल्या.
पुण्यातील कॅम्प आणि खडकी परिसरतील 'भूत बंगला' नावाने ओळखल्या जाणाऱ्या दोन बंगल्यात जाऊन आम्ही प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी धक्कादायक चित्र दिसले. या बंगल्यात जागोजागी अमली पदार्थ घेतल्याचे अवशेष दिसून आले. सिरिंज, दारूच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे, काही भिंतीवर रक्ताने लिहिलेली अक्षरे आम्हाला आढळली. एकूण काय तर ही ठिकाणे म्हणजे दारुड्यांचा, व्यसनाधीन तरुणांचा अड्डा बनल्याचे निदर्शनास आले. या बंगल्यात होणाऱ्या अवैध घटनांना वेळीच पायबंद घातला नाही, तर एखादी गंभीर घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही यावेळी या तरुणांनी सांगितले.